साहेब, जिल्हाप्रमुख कुठेच नसतात, ते फक्त पैसे कमवायलेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:32 AM2021-08-29T04:32:22+5:302021-08-29T04:32:22+5:30
बीड : ‘आम्हाला कोठेही मान, सन्मान मिळत नाही. आंदोलन करायचे म्हणले तर एकसुद्धा जिल्हाप्रमुख समोर येत नाही. अहो, हे ...
बीड : ‘आम्हाला कोठेही मान, सन्मान मिळत नाही. आंदोलन करायचे म्हणले तर एकसुद्धा जिल्हाप्रमुख समोर येत नाही. अहो, हे मोठे पदाधिकारी पक्ष वाढवायचा सोडून फक्त पैस कमवायला लागलेत. यांना इतरांचे काही देणे-घेणे नाही,’ असे म्हणत उपजिल्हाप्रमुख व इतर पदाधिकाऱ्यांनी मनातील खदखद ओठांवर आणत संपर्कप्रमुख तथा रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्यासमोर जिल्हाप्रमुखांविराेधात आरोपांच्या फैरी झाडल्या. विशेष म्हणजे याला भाषणाप्रमाणे टाळ्याही भेटल्या.
मागील काही दिवसांपासून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत गटबाजी सुरू आहे. जिल्हाप्रमुखांविरोधातच आता इतर पदाधिकारी आक्रमक होत आहेत. त्यातच आता काही महिन्यांवर पालिका व नगरपंचायत निवडणुका आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर संपर्कप्रमुख संदीपान भुमरे यांनी शनिवारी पदाधिकाऱ्यांची बैठक घेत अडचणी समजून घेतल्या. यावर पदाधिकाऱ्यांनी जिल्हाप्रमुखांवरच निशाणा साधला. ते खालच्या पदाधिकाऱ्यांना मानसन्मान देत नाहीत. साधी बसायला खुर्चीही देत नाहीत. त्यांना आपल्याच पदाधिकाऱ्यांचे नाव आणि पदही माहीत नाही. सत्ता असतानाही एकही काम मिळत नाही. हे फक्त स्वत: धंदे करून पैसे कमवायला लागलेत, असे घाणाघाती आरोप पदाधिकाऱ्यांनी केले. तसेच स्वत:हून एकही वेळेस जिल्हाप्रमुख तालुक्यात येत नाहीत. असे असेल तर आम्हाला बळ कसे मिळेल? असा सवालही तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. या सर्व बैठकीत पदाधिकाऱ्यांनी मनातील खंत ओठांवर आणल्याचे दिसले.
--
वेळेच कारण देत जाधवांनी आरोप थांबविले
पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचे नियोजन असतानाही पदाधिकाऱ्यांना बोलू दिले नाही. थेट जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांचे बोलण्यासाठी नाव घेताच इतर लोक आक्रमक झाले. त्यानंतर जाधव खाली बसले. तीन-चार पदाधिकारी बोलल्यावर पुन्हा जाधव उठले. वेळ कमी असल्याचे सांगत त्यांनी बोलायला सुरुवात केली. वेळच नव्हता तर पदाधिकाऱ्यांशी संवादाचे नियोजन केलेच कशाला? आम्ही कोणाकडे समस्या मांडायच्या? जिल्हाप्रमुखांकडून कायम खच्चीकरण केले जात असल्याची चर्चा पदाधिकाऱ्यांमध्ये होती.
--
खांडे म्हणतात, रेकॉर्डिंग करू नका
पदाधिकारी आपल्या मनातील खदखद व्यक्त करताना थेट जिल्हाप्रमुखांना लक्ष्य करीत होते. हा सर्व प्रकार काही कार्यकर्ते, पदाधिकारी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करीत होते. हा सर्व प्रकार सोशल मीडियावर जाण्याच्या भीतीने जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी रेकॉर्डिंग करणाऱ्यांना थांबविले.
--
शिवसेना फक्त सोशल मीडियापुरतीच
जिल्ह्यात शिवसेनेचे काहीच काम नाही. फक्त फेसबुक आणि व्हॉटस्ॲपवर काम दिसते. सोशल मीडियावर फोटो टाकले म्हणजे कामे होत नाहीत. लोकांची कामे झाले आणि कार्य झाले तरच चांगले आहे. त्यासाठी जिल्ह्यात जातीने लक्ष घाला, अशी मागणीही एका उपजिल्हाप्रमुखाने केली.
280821\28bed_20_28082021_14.jpg
बीडमध्ये शिवसेना संपर्क प्रमुख संदीपान भामरे यांच्या उपस्थितीत पदाधिकारी बैठक पार पडली.