साहेब, सगळेच पैसे कमवायलेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:36 AM2021-09-18T04:36:57+5:302021-09-18T04:36:57+5:30
मंडपात गर्दी करायची नाही... मुखदर्शनसुद्धा नाही... भाविकच फिरकले नाहीत. आपला जाण्यायेण्याचा खर्चही निघतो की नाही, याची पंचाईत. बाप्पांनी ...
मंडपात गर्दी करायची नाही... मुखदर्शनसुद्धा नाही... भाविकच फिरकले नाहीत. आपला जाण्यायेण्याचा खर्चही निघतो की नाही, याची पंचाईत. बाप्पांनी त्याला जवळ खेचले अन् अरे साक्षात विघ्नहर्ता असल्यावर तू कशाला बिनकामाचे टेन्शन घेतो. मूषकाच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली. प्रफुल्लित होऊन त्याने काय महाराज, कुठे सेटिंग तर नाही ना लावली? असे म्हणत शेपटी हलवली. बाप्पांनी डोळे विस्फारताच मूषकाने कान पकडून सॉरी.. सॉरी म्हणत चरणस्पर्श केले. बाप्पा सिंहासनावर विराजमान होत म्हणाले, अरे पैसा म्हणजे सगळं आहे का.. कोरोनातून आता कोठे सावरत आहेत सगळे, तरीही उत्साह बघ जरा भक्तांचा... मूषकाने टुणकन उडी मारली अन् बाप्पांसमोर येऊन ‘महाराज, हे भाषणात बोलायला ठीक आहे हो !’ परवा नाही का सेनेतच्या दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्याने पक्षाच्या बैठकीत मंत्र्यांसमोर सगळे पैशांच्या मागे लागलेत... असा जाहीर बाण सोडला. निशाणा दुसऱ्या-तिसऱ्या कोणावर नाही तर जिल्हाप्रमुखावर होता. बाप्पांनी कान सुपाएवढे केले... मूषक त्वेषात येऊन सांगत होता...महाराज, तो पदाधिकारी बोलला ते इथल्या राजकारणाचे मर्म आहे. पैशाबिगर पान हलत नाही. खालपासून वरपर्यंत सगळ्या सिस्टीमला भ्रष्टाचाराची कीड लागलीय. मूषकाने काही फाईल बाप्पांच्या पुढ्यात ठेवल्या.. महाराज, हे बघा पुरावे. कोणी जलयुक्तमध्ये हात धुतले तर कोणी रोहयोत स्वर्गवासी व नोकरदार लोकांची नावे घुसवून पैसे लुबाडले. कोणी कागदावरच रस्ते केले तर कोणी पाणी योजना गिळल्या. अहो, शौचालयसुद्धा सोडले नाही... मूषक सांगत होता अन् बाप्पा ऐकत होते. महाराज, बाप बडा ना भैय्या... सबसे बडा रुपय्या..! असे म्हणत मूषकाने शेपटी हलवली. बाप्पा म्हणाले, अरे पुरावे आहेत तर कारवाया का होत नाहीत... मूषक खिशात हात घालून नोट काढतो अन् बाप्पांपुढे झळकावत ‘पैसा बोलता है...’ म्हणतो. बाप्पा आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहतच राहतात.