साहेब! अभ्यासाला बसतोय, पण मनच लागेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:36 AM2021-03-09T04:36:32+5:302021-03-09T04:36:32+5:30
बीड : अभ्यासाला बसतोय; पण लक्षात राहत नाही. मनही लागत नाही. बेचैन होतेय, अशा तक्रारी सध्या किशोरवयीन मुलांच्या असल्याचे ...
बीड : अभ्यासाला बसतोय; पण लक्षात राहत नाही. मनही लागत नाही. बेचैन होतेय, अशा तक्रारी सध्या किशोरवयीन मुलांच्या असल्याचे समोर आले आहे. याबरोबरच त्वचेबाबतही मुलांच्या समस्या सर्वाधिक आहेत. या सर्वांवर राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत उपचार करण्यात आले आहेत.
आरोग्य विभागाच्यावतीने राज्यात २०१४ पासून राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम राबविण्यात येतो. राज्यातील १४ जिल्ह्यात हा कार्यक्रम सध्या कार्यान्वित असून, बीड जिल्ह्यातील ३६ आरोग्य संस्थांमध्ये हा कार्यक्रम राबविला जातो. या अंतर्गत १० ते १९ वर्षे वयोगटातील मुलांच्या समस्या जाणून घेत त्यांच्यावर उपचार केले जातात. शाळा, महाविद्यालयांमध्ये जावून मार्गदर्शन करण्यासह त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जातात. या मुलांच्या सर्वाधिक तक्रारी या त्वचा व मानसिक आजारांसंदर्भात आहेत. काही मुले तासन्तास अभ्यास करतात; परंतु त्यांच्या लक्षातच राहत नाही, तसेच काहींचे मन लागत नाही. काहींना झोप लागते तर काही पाठांतराने डोके जड पडत असल्याचे सांगतात, तसेच वाढत्या वयाबरोबर त्वचा, प्रजनन आरोग्य व शरिरातील बदलाच्याही समस्या मुले मांडतात. या सर्वांना समुपदेशकांमार्फत समुपदेशन केले जाते. शिवाय वैद्यकीय तज्ज्ञ व आरोग्य विभागामार्फत उपचार केले जात असल्याचे सांगण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या राबविला जात असून, जिल्हा समन्वयक म्हणून संतोष हरणमारे काम पाहतात.
४ संस्थेत समुपदेशकच नाहीत
जिल्ह्यातील २२ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि १४ ग्रामीण, उपजिल्हा आणि जिल्हा रुग्णालय अशा ३६ आरोग्य संस्थांमध्ये हा कार्यक्रम राबविला जातो; परंतु केज, धानोरा, आष्टी व माजलगाव येथे मागील दोन वर्षांपासून समुपदेशक हे पद रिक्त आहे. हे पदे भरण्याची कार्यवाही सध्या सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते.
लॉकडाऊननंतर ३५६ कार्यक्रम
लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालये बंद होती. आता उघडल्यानंतर आतापर्यंत ३५६ कार्यक्रम घेण्यात आले आहेत. यात ११ हजार ४३९ लोकांना समुपदेशन करण्यात आल्याची नोंद आहे.
-----
आकडे बोलतात...
एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ पर्यंतचे आकडे
वयोगट १० ते १९ वर्षे
--
आतापर्यंत समुपदेशन व उपचार
मुले ७६५३
मुली ७०८२
---
प्रजनन संस्थेचे आरोग्याबाबत तक्रारी
मुले ११०
मुली २५
--
त्वचेच्या तक्रारी
मुले ७२८
मुली ६८९
--
लोहवर्धक गोळी एवढ्यांना दिली
मुले २६९३
मुली ३२३४
---
बाह्य संपर्क कार्यक्रम ३५६
लोकांना समुपदेशन - ११,४३९
--
एवढ्या आरोग्य संस्थेत कार्यक्रम
२२ प्राथमिक आरोग्य केंद्र
१४ जिल्हा, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये
===Photopath===
080321\082_bed_12_08032021_14.jpeg
===Caption===
शाळांमध्ये जावून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हा रूग्णालयातील समन्वयक संतोष हरणमारे व त्यांचे पथक.