शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 07:42 PM2017-09-17T19:42:02+5:302017-09-17T19:43:51+5:30
पाणी आणण्यासाठी गेलेल्या बहीण-भावाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी ५ वाजता बीड तालुक्यातील नागापूर खुर्द येथे घडली.
बीड : पाणी आणण्यासाठी गेलेल्या बहीण-भावाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी ५ वाजता बीड तालुक्यातील नागापूर खुर्द येथे घडली.
शिवलिंग (१०) व रोहिणी आसाराम साळुंके (१३) अशी या बहीण-भावाची नावे आहेत. आसाराम साळुंके हे शेती व्यवसाय करतात. त्यांना शिवलिंग व रोहिणी ही दोनच मुले होती. रविवारी सुटी असल्याने हे दोघे शेतात गेले होते. वडील फवारणीत तर आई शेतीकामात व्यस्त असताना शिवलिंग शेततळ्याजवळ पाणी आणण्यासाठी गेला, याचवेळी तोल जाऊन तो पाण्यात पडला. छोट्या भावाला वाचविण्यासाठी रोहिणीही धावली. तीही पाण्यात पडली. यामध्ये दोघांचाही बुडून मृत्यू झाला.
मुले दिसत नसल्याने वडील आसाराम यांनी शेततळ्याकडे धाव घेतली असता ही घटना उघडकीस आली. आरडाओरड करुन परिसरातील लोकांना बोलावून दोघांचाही मृतदेह बाहेर काढण्यात आले. जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.