अटकेच्या बातमीमुळे आरोपीस २५ वर्षानंतर भेटली बहीण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 11:51 PM2019-11-15T23:51:33+5:302019-11-15T23:52:33+5:30
तालुक्यातील आहेरवडगाव परिसरात ४ आॅक्टोबर रोजी एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. याचा शोध लावत ग्रामीण पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्यावर शुक्रवारी गुन्हा दाखल केला.
बीड : तालुक्यातील आहेरवडगाव परिसरात ४ आॅक्टोबर रोजी एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. याचा शोध लावत ग्रामीण पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्यावर शुक्रवारी गुन्हा दाखल केला. त्याला न्यायलयात हजर करण्यासाठी नेत असताना आरोपीची बहीण पोलीस ठाणे परिसरात आली आणि आरोपीला गळ््यात पडून रडू लागली. या दोघांची भेट तब्बल २५ वर्षांनी झाली होती. आरोपीला न्यायालयात हजर केले त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आहेरवडगाव शिवारात बाजरीच्या शेतात आरोपी बाळासाहेब ओंबसे याने शारदा नामदेव आवाड या महिलेचा गळा दाबून खून केला होता. त्याठिकाणी हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्याच्या शेजारी काही वस्तू सापडल्या होत्या.
दरम्यान, या महिलेचे वय किती आहे, किंवा तिचे गाव कोणते अशी कोणतीही माहिती नसताना. बीड ग्रामीण पोलिसांनी तापासाची चक्रे फिरवत आरोपीला अटक केली होती. हा तपास करण्यासाठी पोलिसांना तब्बल सव्वा महिना लागला.
आरोपी बाळासाहेब ओंबसे याचे गाव जामखेड तालुक्यातील पिंपरखेडा हे आहे. त्याचे त्याठिकाणी व परिसरात नातेवाईक आहेत. बाळासाहेब ओंबसे हा मागील २५ वर्षापासून बेपत्ता होता. तो कुठे आहे काय करतोय याची कोणालाही माहिती नव्हती तसेच तो नातेवाईकांच्या देखील संपर्कात नव्हता.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील एका मंदिरात पुजारी म्हणून कार्यरत होता. दिवसभर पुजाअर्चा, देव, धर्म यातच तो मग्न असायचा.
दरम्यान मयत शारदा आवाड या महिलेची ओळख बाळासाहेब ओंबसे याच्याशी भेट झाली. भेटीचे रुपांतर आर्थिक व्यवहारात झाले.
वडवणी येथे मंदिर बांधून देते, तिथे माझी जमीन आहे. असे म्हणून बाळासाहेब ओंबसे या पुजाऱ्याकडून महिलेने १ लाख ३५ हजार रुपये उकळले होते. ते परत न दिल्यामुळे बाळासाहेब याने आशा आवाड या महिलेचा गळा दाबून खून केला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत बाळासाहेब याला अटक केली.
या अटकेच्या बातम्या वाचून आरोपीच्या नातेवाईकांनी बीडला धाव घेतली. यात नथ्थाबाई डोंगरे (रा.मोहा.ता.जामखेड ) ह्या बीड येथे भावाला पाहण्यासाठी आल्या. त्या तब्बल २५ वर्षांनी भावाला पाहणार होत्या. याच दरम्यान पोलीस आरोपी बाळासाहेब ओंबसे याला न्यायलयात हजर करण्यासाठी घेऊन जात होते.
त्याचवेळी भावाला पाहून नथ्थाबाई यांनी एकच टाहो फोडला आणि त्याच्या गळ््यात पडून ढसाढसा रडू लागल्या. तब्बल २५ वर्षांनी नथ्थाबाईला भाऊ भेटला होता परंतु बेड्या ठोकलेला. त्यामुळे त्यांना आनंदापेक्षा दु:ख जास्त असल्याचे त्यांच्या आक्रोशातून दिसून येत होते. आरोपीला देखील यावेळी गहिवरून आले.
तो देखील धायमोकलून रडू लागल्याचे पाहून उपस्थितांनाही गहिवरून आले. २५ वर्षात त्यांच्या नातेवाईकांत घडलेल्या घटनांचा पाढा रडतरडतच नथ्थाबाईने भावापुढे मांडला. आरोपीचा भाऊ आणि भावजय मयत झाल्याचे ऐकून आरोपी हुंदके देऊन रडत होता.
आरोपीला २२ तारखेपर्यंत पोलीस कोठडी
खूनातील आरोपी बाळासाहेब ओंबसे याला शुक्रवारी न्यायलयात हजार करण्यात आले. त्याला न्यायालयाने २२ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणात खून व अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल आहे. पोलीस उपाधीक्षक भास्कर सावंत हे करीत आहेत. ही कारवाई बीड ग्रामीण पोलीस ठाणे प्रमुख सपोनि सुजीत बडे व सहकाऱ्यांनी गुरुवारी केली होती.