अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करून बहिणीवर तलवारीने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 11:45 PM2019-06-26T23:45:56+5:302019-06-26T23:46:34+5:30
घराजवळ कोणीतरी उभे असल्याचे पाहताना एका १५ वर्षीय मुलीचे तोंड दाबून घराच्या मागे नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. दरम्यान हा प्रकार पाहणाऱ्या सदर मुलीच्या १३ वर्षीय बहिणीवर तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना २० जून रोजी तालुक्यातील नागझरी येथे रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली.
गेवराई : घराजवळ कोणीतरी उभे असल्याचे पाहताना एका १५ वर्षीय मुलीचे तोंड दाबून घराच्या मागे नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. दरम्यान हा प्रकार पाहणाऱ्या सदर मुलीच्या १३ वर्षीय बहिणीवर तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना २० जून रोजी तालुक्यातील नागझरी येथे रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरुन २५ जून रोजी गेवराई पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील नागझरी येथील १५ वर्षीय मुलगी आपल्या बहिणीसोबत घरात होती. त्याचवेळी २० जून रोजी रात्री १२ च्या सुमारास आपल्या घरासमोर कोणीतरी उभे आहे, हे पाहत असताना आरोपींनी तिचे तोंड दाबून घरामागे नेले. अत्याचार सुरू असताना बहिणीचा आवाज ऐकू आल्याने तिची १३ वर्षीय बहीण त्या ठिकाणी गेली असता आरोपींनी तिच्यावर तलवारीने वार केले. मानेवर व हाताच्या बोटावर वार लागल्याने ती गंभीर जखमी झाली. तिच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना घडल्यानंतर ५ दिवसांनी गेवराई ठाण्यात २५ जून रोजी रात्री मुलीच्या फिर्यादीवरुन नारायण भारत पवार, पप्पु भारत पवार , देवगण विश्वास चव्हाण, शहादेव विश्वास चव्हाण व जावेद विश्वास चव्हाण या पाच आरोपींविरूद्ध गेवराई ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून,आरोपी फरार आहेत. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक अश्विनी कुंभारे या करीत आहेत.
मागील गुन्ह्याची पार्श्वभूमी
दीड महिन्यापूर्वी नागझरी गावात मारहाणीत एकाचा खून झाला होता. या प्रकरणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील दोन आरोपी हे पीडित मुलीचे वडील आणि आई आहेत. मंगळवारी मुलीवरील अत्याचारप्रकरणी ठाण्यात फिर्याद देण्यासाठी आलेल्या आईला पोलिसांनी अटक केली. तर वडील फरार आहेत.
नागझरी येथे २५ जून रोजी घडलेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपी शहादेव विश्वास चव्हाण, जावेद विश्वास चव्हाण, देवगण विश्वास चव्हाण हे तिघेही सख्खे भाऊ आहेत. यातील जावेद हा दीड महिन्यांपूर्वी नागझरी येथे झालेल्या खून प्रकरणातील फिर्यादी आहे. त्यामुळे या दोन्ही घटनांचा एकमेकांशी संदर्भ आहे काय ? हे तपासात समोर येईल.
पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी
या प्रकरणी पीडितेला मेडिकलला पाठवले असून, या गुन्ह्याचा तपास योग्यरीतीने लावून गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात येईल, असे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अश्विनी कुंभारे यांनी सांगितले.
बुधवारी बीड येथील जिल्हा रुग्णालयात पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.