'शांत बसा, नाही तर...'; चोरट्यांनी धमकी देत एक लाखांच्या रोकडसह सोन्याचे दागिने पळवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 15:57 IST2025-04-21T15:56:50+5:302025-04-21T15:57:34+5:30
चोरटे समोरच्या इमारतीच्या छतावर झोपलेल्या बिहारी मंजुरांच्या कॅमेर्यात कैद; आष्टी ठाण्यात गुन्हा दाखल

'शांत बसा, नाही तर...'; चोरट्यांनी धमकी देत एक लाखांच्या रोकडसह सोन्याचे दागिने पळवले
- नितीन कांबळे
कडा- दाराचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी व्यापाऱ्याच्या घरात प्रवेश करत एक लाखांची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिने लुटल्याची घटना सोमवारी पहाटे पावणेतीन वाजेच्या दरम्यान कडा येथील धामणगाव रोडवर घडली. या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आष्टी तालुक्यातील कडा येथील धामणगाव रोडलगत व्यापारी दिलीप बलदोटा यांचे घर आहे. सोमवारी पहाटे पावणेतीन वाजेच्या दरम्यान दरवाजाचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी व्यापारी बलदोटा यांच्या घरात प्रवेश केला. चाहूल लागताच कुटुंबातील सदस्य जागे झाले. मात्र, चोरट्यांनी आरडाओरड करू नका, चुपचाप बसा अन्यथा वाईट होईल, असा दम भरला. त्यानंतर कपाटातील सोन्याचे दागिने आणि एक लाख रूपये रोकड असा २ लाख ३२ हजार रूपयाचा ऐवज लंपास केला. दिलीप बलदोटा यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे करीत आहेत.
चोरटे व्हिडीओ कॅमेर्यात कैद
घरफोडी करून चोरटे पळून जात होते. याचवेळी समोरच्या घराच्या छतावर झोपलेल्या बिहारी मजुरांना चोरटे नजरेस पडले. त्यांनी लागलीच मोबाईलमध्ये चोरांच्या हालचाली कैद केल्या. तसेच पोलिसांना माहिती दिले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेताच चोरटे तेथून पसार झाले.