बीडमध्ये सहा जणांवर ‘आपत्ती’; १६ जनावरांसह ९०० कोंबड्या दगावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 05:56 PM2021-09-09T17:56:38+5:302021-09-09T18:01:33+5:30
Rain in Beed : हजारो हेक्टर जमीन व पिके पाण्याखाली गेल्याने हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.
बीड : जिल्ह्यात मागील तीन दिवसांत अतिवृष्टीमुळे मोठी जीवितहानी झाली. यात सहा जणांचा बुडून, वाहून गेल्याने मृत्यू झाला. तसेच १६ जनावरांसह ९०० कोंबड्या दगावल्या. मागील तीन दिवसांत तब्बल ७४ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यात पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात तीन दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. दिवस-रात्र पाऊस पडत असल्याने ६ मध्यम व ४२ लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. तसेच गेवराई तालुक्यात तीन साठवण तलाव फुटले आहेत. धारूरमधील आरणवाडी तलावाचा सांडवा दुसऱ्यांदा फोडावा लागला. नद्या, नाल्यांसह ओढे खळखळून वाहून गेले. अनेक गावांत पाणी शिरले. हजारो हेक्टर जमीन व पिके पाण्याखाली गेल्याने हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रशासनाने बुधवारी पाऊस कमी झाल्यानंतर पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा - मराठवाड्यात का होतेय ढगफुटी ? हवेच्या ‘डाऊन ट्रॅप’चा नेमका संबंध किती, जाणून घ्या
दरम्यान, मागील तीन दिवसांत पावसाने सहा जणांचा बळी घेतला आहे. यात वडवणी तालुक्यातील तीन, माजलगावमधील २ व बीड व गेवराई तालुक्यातील एकाचा समावेश आहे. तसेच आष्टी तालुक्यात ११ जनावरे दगावली. ११० घरांची पडझड झाली. गेवराईत १ तर बीड तालुक्यात ४ जनावरे वाहून गेली. माजलगाव तालुक्यात कुक्कुटपालनमध्ये पाणी शिरल्याने ९०० कोंबड्या दगावल्या. पिकांच्या नुकसानीसह जीवितहानी झाली असून मदत करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.