मांजराचे सहा दरवाजे उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 09:59 PM2017-09-22T21:59:40+5:302017-09-22T22:05:00+5:30
लातुर, उस्मानाबाद आणि बीड या तीन जिल्ह्यांतील सिंचनासाठी वरदान ठरलेले आणि ४० गावांना पिण्याचे पाणी पुरविणारे केज तालुक्यातील मांजरा धरण शुक्र वारी पहाटे सहा वाजता ९९.४७ टक्के भरले. त्यामुळे तात्काळ धरणाचे सहा दरवाजे २५ सेंटी मीटरने उघडण्यात आले.
केज (जि. बीड) : लातुर, उस्मानाबाद आणि बीड या तीन जिल्ह्यांतील सिंचनासाठी वरदान ठरलेले आणि ४० गावांना पिण्याचे पाणी पुरविणारे केज तालुक्यातील मांजरा धरण शुक्र वारी पहाटे सहा वाजता ९९.४७ टक्के भरले. त्यामुळे तात्काळ धरणाचे सहा दरवाजे २५ सेंटी मीटरने उघडण्यात आले. परिणामी मांजरा धरणा खालील नदी पात्रात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे
या धरणाची पाणी पातळीची क्षमता ६४२.३७ मीटर एवढी आहे. सध्या या धरणातील एकूण पाणी साठा २२३.१५७ दलघमी एवढा असून धरणात येणा-या पाण्याचा ओघ ११.९७३ दलघमी प्रतिसेकंद असा आहे. सहा दरवाजे उघडल्यामुळे धरणातून १४८.२० घनमिटर/प्रतिसेकंद या वेगाने पाण्याचा विसर्ग मांजराच्या नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे धरणाखालील नदीच्या काठावरील गावांत पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील वर्षी २६ सप्टेंबर रोजी या धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले होते. १९८५ पासून आतापर्यंत १४ वेळा या धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत
८२ गावांना सावधानतेचा इशारा
मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडल्यामुळे कर्नाटक राज्याच्या सिमेपर्यंतच्या नदीकाठच्या सौंदना, आवाड शिरपूरा, नायगाव, इस्थळ, वाकडी, आपेगाव, पाटोदा(ममदापुर), धानोरा, तांदुळजा आदी ८२ गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती मांजरा धरणाचे शाखा अभियंता शाहुराज पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली
पोलीस बंदोबस्त वाढविला
मांजरा धरण हे बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या सिमेवर असल्यामुळे मांजरा धरण भरल्याच्या पाशर््वभूमीवर बीड व उस्मानाबाद पोलीस मुख्यालयाकडून त्यांच्या हद्दीत चोख बंदोबस्त सुरू असल्याची माहिती सपोनि राहुल देशपांडे यांनी दिली .