मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडले;धरण भरल्याने बीडसह लातूर,उस्मानाबाद जिल्हे सुखावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 09:15 AM2021-09-22T09:15:36+5:302021-09-22T09:16:22+5:30
Rain In Beed : बीडसह लातूर, उस्मानाबाद जिल्ह्याचा मुख्य जलस्रोत मांजरा धरण भरल्याने दिलासा
- दीपक नाईकवाडे
केज : बीडसह उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील बहुतांशी भागाचा प्रमुख जलस्त्रोत असणारा मांजरा प्रकल्प मंगळवारी (दि.२१ ) दुपारी तुडुंब भरल्याने कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. मात्र दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसाने धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली. त्यामुळे आज बुधवारी (दि.२२) सकाळी ६ वाजता धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून पाणी नदीपात्रात सोडण्यात आले.
मंजर धरणाची साठवण क्षमता २२४ दलघमी आहे. काल सकाळपर्यंत या धरणात २२३.६२५ दलघमी साठा होता. त्यानंतर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने मंगळवारी दुपारी १ वाजता उजव्या कालव्यातून १.२७ प्रतीसे.घ.मी. वेगाने पाण्याचा विसर्ग सरू करण्यात आला होता. मात्र, दुपारनंतर मुसळधार पाऊस झाल्याने धरणात पाण्याची आवक वेगाने वाढली आणि बुधवारी पहाटेपर्यन्त धरणात २२५.५ दलघमी पाणीसाठा झाला. त्यामुळे सकाळी ६ धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून प्रती सेकंद १४९.८० घनमीटर वेगाने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला. सहा वर्षांच्या दुष्काळानंतर २०१६ साली झालेल्या मुसळधार पावसाने या धरणाचे धरणाचे दरवाजे उघडण्याचा योग आला होता. त्यानंतर अपवाद वगळता नियमितपणे हे धरण प्रतिवर्षी पूर्ण क्षमतेने भरत आहे. यंदाही निसर्गाने भरभरून दान दिल्यामुळे सलग तिसऱ्या वर्षी हे धरण तुडुंब भरले असून दरवाजे उघडण्याचा सुखावह प्रसंग आज अनुभवयास मिळाला असून सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.