राखेची वाहतूक करणारे सहा हायवा टिप्पर परळी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:47 AM2021-02-26T04:47:20+5:302021-02-26T04:47:20+5:30
येथील शहर पोलीस व संभाजीनगर पोलीस मात्र काहीही कारवाई करत नसल्याचे दिसत आहे. ...
येथील शहर पोलीस व संभाजीनगर पोलीस मात्र काहीही कारवाई करत नसल्याचे दिसत आहे. परळी शहरातून राखेची वाहतूक जोरात होत असल्याने त्याचे प्रदूषण होऊन नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक ठरत आहे. त्यामुळे शहरातून होणारी ही राख वाहतूक बंद करावी या मागणीसाठी १ मार्च रोजी राख प्रदूषण नियंत्रण समितीने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तसेच दाऊतपूर येथील राख तळ्यातील राख व जवळच असलेल्या वडगाव शिवारातील शेतात साठेबाजी केलेली राख हवेने उडून दादाहरी वडगाव येथील ग्रामस्थांना त्रासदायक ठरत असल्याने या प्रकरणी वडगावकरच्या महिला व पुरुषांनी एकत्रित येऊन रास्ता रोको आंदोलन केले. परंतु अद्याप परळी विद्युत केंद्राने काही राख साठेबाजी करणाऱ्यांवर काहीही कारवाई केली नसल्याने ग्रामस्थ नाराज आहेत. लवकरच आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी पुन्हा दिला आहे .
दादाहरी वडगाव शिवारात असलेले राखेचे साठे अद्याप उचलले नाहीत व साठेबाजी करणाऱ्या राख माफियांवर कारवाई केली नाही, असा आरोप गावचे माजी सरपंच शिवाजी शिंदे यांनी केला आहे . प्रदूषणामुळे व राखेच्या वाहनामुळे परळी-गंगाखेड मार्गावरून दुचाकी चालविणे अशक्य झाले आहे. या मार्गावर अपघाताचा धोका वाढला आहे, तरीही प्रशासन हलायला तयार नाही. त्यामुळे ग्रामस्थांना त्रास चालूच आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी सरपंच शिवाजी शिंदे यांनी दिला आहे.
गेल्या दहा वर्षांपासून हा राखेच्या प्रदूषणाचा त्रास होत आहे. आता यात वाढ झाली आहे. या प्रकरणी दहा वर्षांपूर्वी विद्युत केंद्राच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी कोंडले होते. आता पुन्हा ग्रामस्थ प्रदूषणाला कंटाळले असून आंदोलन आक्रमक पद्धतीने करण्याचा इशारा दिला आहे. तसेच या १ मार्च रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा राख प्रदूषण नियंत्रण समितीने दिला आहे. पोलीस निरीक्षक शिवलाल पुर्भे म्हणाले की, परळी ग्रामीण पोलिसांनी दाऊतपूर येथे जाऊन राख वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाईची मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत आठ दिवसांत २० वाहनांवर कारवाई केली आहे.