ऊसतोड मजुरांच्या मुकादमास घातला सहा लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 03:48 PM2020-08-03T15:48:01+5:302020-08-03T15:50:06+5:30
फसवणुकीचा हा प्रकार सहा वर्षांपूर्वीचा आहे.
अंबाजोगाई (जि. बीड) : कोल्हापूर कारखान्यास ऊसपुरवठ्यासाठी ट्रॅक्टर व एक ट्रक लावणाऱ्या मुकादमास सहा लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी जवळगाव (ता. अंबाजोगाई) येथील मुकादमावर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. फसवणुकीचा हा प्रकार सहा वर्षांपूर्वीचा आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील धुमडेवाडी येथील रमेश धोंडीबा पाटील यांच्याकडे तीन ट्रॅक्टर व एक ट्रक असून त्याद्वारे ते कारखान्याला ऊस पुरवठा करतात. यासाठी दरवर्षी ते जवळगाव येथून ऊसतोड कामगारांच्या टोळ्या घेऊन जातात. नरसिंह मल्हारी गव्हाणे (रा. जवळगाव) याच्याकडून त्यांचे २०१३ साली झालेल्या व्यवहारातील तीन लाख रुपये येणे बाकी होते. २०१४ साली रमेश पाटील हे वसुलीसाठी नरसिंहकडे गेले. तेव्हा नरसिंह याने चालू वर्षी सहा लाखांत आठ कोयते घेऊन येतो, अशी ग्वाही दिली. त्यासाठी रमेश पाटील यांनी त्याच्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेऊन आणखी तीन लाख रुपये दिले.
याचे करारपत्र ७ जुलै २०१४ रोजी अंबाजोगाई तहसील कार्यालय येथे केले; परंतु त्यानंतर ते नरसिंह आणि ऊसतोड कामगार यांना कोल्हापूरला घेऊन जाण्यासाठी गाडी घेऊन आले असता तो घर बंद करून निघून गेला होता. तीन दिवस गावात थांबून शोध घेऊनही तो दिसला नाही. अनेक ठिकाणी शोध घेऊनही तो आतापर्यंत सापडला नाही. अखेर रमेश पाटील यांनी शुक्रवारी अंबाजोगाई शहर ठाणे गाठून फसवणुकीची तक्रार दिली. याप्रकरणी नरसिंह गव्हाणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.