सहा महिन्यांच्या मुलीची आईनेच केली हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 12:11 AM2020-03-16T00:11:50+5:302020-03-16T00:12:20+5:30
११ मार्च रोजी तळणेवाडी (ता. गेवराई) शिवारात पाण्याच्या कॅनॉलमध्ये सहा महिन्याच्या मुलीचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
बीड : ११ मार्च रोजी तळणेवाडी (ता. गेवराई) शिवारात पाण्याच्या कॅनॉलमध्ये सहा महिन्याच्या मुलीचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. रविवारी या गुन्ह्याचा उलगडा पोलिसांनी केला असून, मुलीच्या हत्येप्रकरणी तिच्या आईला ताब्यात घेण्यात आले आहे.
गेवराई तालुक्यातील तळणेवाडी शिवारात कॅनॉलच्या पाण्यात सहा महिन्याच्या मुलीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती मनोज अजमेरा यांनी पोलिसांना दिली होती. त्यावरुन पोउपनि टाकसाळ व सहकाऱ्यांनी घटनास्थळी जात पाहणी केली. गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच फोटो काढून परिसरातील गावांमध्ये शोधाशोध केली.
दरम्यान, टाकसाळ यांच्या तक्रारीवरुन गेवराई ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोनि पुरुषोत्तम चोबे यांनी सहकाºयांसह गुन्ह्यातील आरोपीचा व नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी कॅनॉलच्या बाजूस असलेल्या जालना, बीड व औरंगाबाद जिल्ह्यातील गावांची तपासणी केली. या दरम्यान एका गावात मयत मुलीच्या आईचा शोध लागला. यावेळी तिला विश्वासात घेऊन मपोउपनि मनीषा जोगदंड यांनी विचारपूस केली असता, अनैतिक संबंधातून मुलगी जन्मली असल्यामुळे त्या मुलीस वाहत्या पाण्याच्या कॅनॉलमध्ये टाकून ठार मारल्याची कबुली मुलीच्या आईने दिली. याप्रकरणी तपासी अंमलदार संदीप काळे यांनी १४ मार्च रोजी मुलीच्या आईस अटक केली. तिला न्यायालयासमोर हजर केले असता, पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उप विभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि पुरुषोत्तम चोबे, सपोनि संदीप काळे, पोउपनि युवराज टाकसाळ, पो. कर्मचारी नवनाथ गोरे, एकनाथ कावळे, ज्योती साळुंके, चकलांबा पोलीस ठाण्याचे सपोनि देशमुख, पोहेकाँ बाळासाहेब सिरसाट, पोकाँ महेश रुईकर यांनी केली.