भगरीच्या भाकरी खाल्याने सहा जणांना विषबाधा, तर भात खाणारे भाविक ठणठणीत
By सोमनाथ खताळ | Published: August 18, 2022 08:16 PM2022-08-18T20:16:46+5:302022-08-18T20:17:09+5:30
मेंगडेवाडी येथील सप्ताहाचा कार्यक्रम सुरू आहे. गुरूवारी उपवासानिमित्त भगर आणली होती.
बीड : ज्या भाविकांनी भगरीचा भात करून खाल्ला त्यांना काहीच झाले नाही, परंतू ज्यांनी भाकरी खाल्या अशा सहा लोकांना विषबाधा झाली. हा प्रकार बीड तालुक्यातील मेंगडेवाडी येथे गुरूवारी दुपारी घडला. ज्यांना उलटी, मळमळचा त्रास सुरू झाला, अशांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे. सर्व ठणठणीत असल्याचे सांगण्यात आले.
मेंगडेवाडी येथील सप्ताहाचा कार्यक्रम सुरू आहे. गुरूवारी उपवासानिमित्त भगर आणली होती. सर्व भाविकांना भात तयार करून देण्यात आला होता. परंतू मुख्य महाराजासोबत असलेले भजनी, वादक, गायक यांनी भाकरी करण्यास सांगितले. भगर न धुताच भाकरी केल्या. त्यामुळे ज्या सहा लोकांनी भाकरी खाल्या, त्यांना मळमळ, उलटीचा त्रास सुरू झाला. ही माहिती समजताच चऱ्हाटा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश तांदळे, डॉ.बांगर, डॉ.मदन काकड, किशोर जाधव, रोहित घोगरे, अमोल गायकवाड यांनी गावात धाव घेतली.
चऱ्हाटा केंद्रात प्राथमिक उपचार करून सर्वांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले. सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गिते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नरेश कासट यांनीही सर्व माहिती घेऊन काळजी घेण्याच्या सुचना केल्या.