सख्ख्या बहिणींमधील वाद विकोपाला, दगडफेकीत सहा जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 12:18 AM2020-01-08T00:18:34+5:302020-01-08T00:19:02+5:30
कौटुंबिक वादाच्या कारणावरून दोन सख्य्या बहिणींचा वाद विकोपाला गेला. मंगळवारी सकाळपासूनच दोन्ही कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद सुरु होता. शाब्दिक चकमकीचे रुपांतर जोरदार हाणामारीत झाले.
बीड : कौटुंबिक वादाच्या कारणावरून दोन सख्य्या बहिणींचा वाद विकोपाला गेला. मंगळवारी सकाळपासूनच दोन्ही कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद सुरु होता. शाब्दिक चकमकीचे रुपांतर जोरदार हाणामारीत झाले. दोघींच्या कुटुंबियांनी एकमेकांवर दगडफेक करत जबर मारहाण केली. ही घटना मगंळवारी सायं ६ ते ६.३० वाजण्याच्या दरम्यान बीड शहरातील पेठ बीड भागात असलेल्या गांधीनगरमध्ये घडली.
रेणुका शिंदे आणि मीरा गुंजाळ अशी दोन्ही बहिणींची नावे आहेत. त्या दोघीही विवाहित असून शहरातील पेठबीड भागात गांधीनगरात शेजारी-शेजारी राहतात. त्या दोघींमध्ये कौटुंबिक कारणावरुन सतत वादावादी होत असे. मंगळवारी सकाळीच पुन्हा एकदा या वादाला सुरुवात झाली होता. त्यानंतर दोघीही परस्परविरोधी तक्रारी घेऊन पोलीस ठाण्यात आल्या होत्या. त्यांच्यातील वाद उफाळलेला असल्याने पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला. दोघीही सख्ख्या बहिणी असल्याने हा वाद समजुतीने मिटविण्याचे ठरले होते. मात्र, सायंकाळी सहा वाजता या वादाचे रुपांतर तुफान हाणामारीत झाले. एकमेकांवर दगडफेक झाली. यामध्ये किरण गुंजाळ, अमर गुंजाळ व अन्य गंभीर जखमी झाले. त्या सर्वांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एकाची प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठवण्यात आले आहे. पेठ बीड ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती. या घटनेची माहिती मिळताच पेठ बीड पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.