आष्टीत कत्तलखान्यातून ६ टन गोवंशीय मांस जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 06:36 PM2019-07-23T18:36:38+5:302019-07-23T18:38:23+5:30
तालुक्यातील खडकत येथे पोलीस पथकाची धाड
आष्टी (बीड ) : तालुक्यातील खडकत येथे विनापरवाना गोवंशीय जनावरांची कत्तल करून मांस विक्री होत असल्याची माहिती उपअधीक्षक विजय लगारे यांना मिळताच त्यांनी पथकासह सोमवारी (दि.२२ ) रात्री ९.३० च्या दरम्यान कत्तलखान्यावर धाड टाकली. यावेळी पथकाने सहा टन गोवंशीय मांस, सोळा जिवंत जनावरे आणि एक टेम्पो जप्त केला.
खडकत येथे गेली अनेक वर्षापासून विनापरवाना जनावरांचा कत्तलखाना सुरू असुन अनेक वेळा कारवाई करण्यात आली आहे. यानंतरही येथे कत्तलखानासुरूच असल्याचे समजताच उपअधीक्षक विजय लगारे यांच्या पथकाने सोमवारी रात्री तेथे धाड टाकली. पथकाने ६ टन मांस, टेम्पो (mh 03 , ct 1630), सोळा जिवंत जनावरे जप्त केली. यानंतर इस्माईल पठाण, शकील पठाण, बबलू पठाण, इर्शाद पठाण, गुड्डू पठाण यांच्या विरूद्ध पोलीस नाईक विकास राठोड यांच्या फिर्यादी वरून मंगळवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी फरार असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव करीत आहेत.
ही कारवाई आष्टीचे उपअधीक्षक विजय लगारे , पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार करपे, पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव, पोलीस हवालदार सोपान हंबर्डॅ, पोलीस शिपाई सोनवणे, शिनगारे, ढवळे, वाहन चालक मिलिंद निकाळजे यांच्या पथकाने केली.