अनुदानासाठी सहा गावांचा बँकेसमोर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 11:25 PM2020-03-04T23:25:10+5:302020-03-04T23:26:56+5:30
गतवर्षी अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाईचे अनुदान देण्यात यावे. यंदाही हाता तोंडाशी आलेले रबीचे पीक अवकाळी पावसाने गेले. गतवर्षीचे अनुदान देण्याच्या मागणीसाठी पोहनेरसह सहा गावांतील शेतकरी ग्रामीण बँकेच्या पोहनेर शाखेसमोर बुधवारी ठिय्या मांडून बसले होते.
सिरसाळा : गतवर्षी अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाईचे अनुदान देण्यात यावे. यंदाही हाता तोंडाशी आलेले रबीचे पीक अवकाळी पावसाने गेले. गतवर्षीचे अनुदान देण्याच्या मागणीसाठी पोहनेरसह सहा गावांतील शेतकरी ग्रामीण बँकेच्या पोहनेर शाखेसमोर बुधवारी ठिय्या मांडून बसले होते.
गतवर्षी परतीच्या पावसाने या भागात पिकांचे नुकसान झाले होते. तालुक्यातील इतर गावांत नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी ८ हजार रु. अनुदान देण्यात आले. परंतु पोहनेरसह दिग्रस, खतगव्हाण, कासारवाडी, तेलसमुख, रामेवाडी या सहा गावांतील शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत. बँकेत वारंवार चकरा मारूनही पदरी निराशाच पडत असल्याने अखेर या सहा गावांतील वीसहून अधिक शेतकरी बँकेच्या दारात ठिय्या मांडून बसले होते. अनुदानाचा धनादेश बँकेत आठ दिवसांपूर्वीच आला आहे तरी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. रक्कम खात्यात जमा होईपर्यंत हलणार नसल्याचे माजी सरपंच विष्णू रोडगे यांनी सांगितले होते.
शाखा व्यवस्थापकाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
४परळीचे तहसीलदार डॉ. विपीन पाटील यांनी शाखा व्यवस्थापक साईनाथ बेलकर यांच्याशी अनुदाना संदर्भात भ्रमणध्वनीवरून संवाद साधल्यानंतर शाखा व्यवस्थापक बेलकर यांनी सोमवारपर्यंत अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतील, असे लेखी आश्वासन दिल्याने सायंकाळी ७.३० वा. ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.