जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात महसूल कर्मचारी संघटनेची जोरदार नारेबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:08 AM2019-07-20T00:08:17+5:302019-07-20T00:10:15+5:30
पाटोदा तालुक्यातील वाळू वाहतूक प्रकरणी तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर जिल्हाधिकाºयांच्या निर्देशानुसार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा गुरुवारी दाखल करण्यात आला होता.
बीड/पाटोदा : पाटोदा तालुक्यातील वाळू वाहतूक प्रकरणी तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर जिल्हाधिकाºयांच्या निर्देशानुसार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा गुरुवारी दाखल करण्यात आला होता. हे गुन्हे खोटे असून, कर्मचा-यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत व तहसीलदार रुपा चित्रक यांना निलंबित करावे या मागणीसाठी जिल्हाधिका-यांना महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. मात्र, त्यावर कुठलाही निर्णय न झाल्यामुळे जिल्हाधिका-यांच्या विरोधात घोषणा देत संघटनेने जिल्हाभरात कामबंद आंदोलन पुकारले आहे.
पाटोदा तहसील कार्यालयात काम करणाºया वैशाली कोल्हे, तलाठी व्ही. व्ही. देशमुख व कोतवाल राहुल गिरी यांच्याविरोधात तहसीलदार रुपा चित्रक यांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, वरील कर्मचा-यांनी उप विभागीय अधिकाºयांच्या चौकशीमध्ये चित्रक यांच्याविरोधात जवाब दिल्याचा राग मनात धरुन या कर्मचा-यांच्याविरोधात कारवाई करण्यात आल्याचे पत्रकात नमूद आहे. तसेच चित्रक यांनी निवडणूक कालावधीत करण्यात आलेला खर्च, वाळू, कार्यालयीन खर्च यामध्ये मोठा अपहार केल्याचे देखील संघटनेने पत्रकात म्हटले आहे. संचिकांवर उशिराने मागील काही दिवसांच्या स्वाक्ष-या करणे, दिवसभर कार्यालयात न येता रात्री उशिरा कर्मचाºयांना बोलावून घेणे, कर्मचाºयांना अपमानास्पद वागणूक देणे याविषयी वरिष्ठांकडे तक्रार करुन देखील कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. या प्रकरणी जिल्हाधिकाºयांना शुक्रवारी महसूल संघटनेचे पदाधिकारी भेटण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांनी संघटनेच्या पदाधिकाºयांशी चर्चा करण्यास नकार दिला.
रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची शुक्रवारी विविध विषयांवर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होती. दरम्यान, बैठक संपल्यानंतर क्षीरसागर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपली कैफियत मांडण्याचा प्रयत्न संघटनेच्या कर्मचाºयांनी केला. यावेळी जिल्हाधिकारी व संघटनेच्या कर्मचा-यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. क्षीरसागर यांच्याकडे निवेदन दिल्यानंतर या प्रकरणी लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन संघटनेला दिले. मात्र, जिल्हाधिका-यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला व गुन्हे मागे घेऊन चित्रक यांचे निलंबन होत नाही तोपर्यंत सर्व महसूल कर्मचारी शनिवारपासून कामबंद आंदोलन करणार आहेत. याचे निवेदन निवासी उप जिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांना भेटून संघटनेच्या पदाधिकाºयांनी दिले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत जोगदंड, सरचिटणीस महादेव चवरे, उपाध्यक्ष सुहास हजारे, कार्याध्यक्ष सचिन देशपांडे, कोषाध्यक्ष जयंत तळीखेडे, तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर राख, बी. डी. घोलप, इंद्रजित शेळके, श्रीनिवास मुळे, जिल्हा कोतलवाल संघटनेचे अध्यक्ष अरविंद राऊत, अमृता वाघूलकर, संध्या मोराळे, मयुरी नवले, अश्विनी पवार, सीमा पवार, वनिता तांदळे, आर. आर. बलाढ्ये, शुभम गाडे, प्रकाश निर्मळ आदींसह इतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. महसूल कर्मचा-यांनी केलेल्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.
काय आहे वाळू प्रकरण : रक्कम चित्रक यांच्याकडे
पाटोदा ठाण्याचे पो.नि. सिध्दार्थ माने यांनी २० डिसेंबर २०१८ रोजी येथील जुने बसस्थानकावर अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रक्टर (एमएच २५ एफ ५११६- (मुळ क्र. ९११६) पकडले.
कार्यवाहीसाठी तहसीलदारांना पत्र पाठवले. तहसीलदारांनी स्थानिक तलाठी व मंडळ अधिकाºयास पंचनामा करून अहवाल पाठवण्याचा आदेश दिला. पंचनाम्यानुसार ट्रक्टरमध्ये १ ब्रास अवैध वाळू आढळली.
त्यावरून तहसीलदार रूपा चित्रक यांनी ट्रक्टर मालक लहू गुंड यास १ लाख ४१ हजार ९७५ रुपये दंड ठोठावण्याची नोटीस दिली.
दरम्यान, पाच महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतर गुंड यांनी दंडाची रक्कम शासनखाती जमा झाली असून ट्रॅक्टर सोडून द्यावे असे पत्र चित्रक यांनी पोलिसांना पाठवले.
गुंड यांनी ट्रॅक्टर सोडून घेताना पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला. त्यांच्या जबाबानुसार त्यांनी दंड म्हणून आकारलेली रक्कम १ लाख ४२ हजार चित्रक यांच्याकडे भरले.
त्यानंतर त्यांनी गाडी सोडण्याचे पोलिसांच्या नावाचे पत्र सुपूर्द केले. वास्तविक अशा स्वरूपाच्या कार्यवाहीतील दंडाची रक्कम रोख स्वरूपात स्वीकारण्याचे अधिकार तहसीलला नाहीत.
रक्कम चालनाद्वारे थेट बँकेत भरणा करून प्रत तहसीलला सादर करावी आणि त्यानंतर उचित कार्यवाही करावी करावी असा नियम आहे.
बेकायदेशीर रोख रक्कम तहसीलदारांनी स्वीकारल्याची मोठी चर्चा झाली. प्रकरण अंगाशी येत असल्याचे लक्षात येताच चित्रक यांनी कर्मचाºयांना बळी देण्यासाठी पोलिसात तक्रार दिल्याचा आरोप संघटनेने केला आहे.