एकाच कुटुंबातील तिघींना सर्पदंश; दोन चिमुकल्या दगावल्या,आईची मृत्यूशी झुंज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 12:09 PM2021-09-08T12:09:21+5:302021-09-08T12:10:34+5:30
Snake bite case : दीपक साखरे हे पत्नी आणि चार मुलीसह सोनेसांगवी नं. २ येथे पत्र्याच्या शेडच्या घरात राहतात.
- दीपक नाईकवाडे
केज ( बीड ) : एकाच कुटुंबातील तिघींना सर्पदंश झाला असून यात दोन मुलींचा मृत्यू झाला तर आईची मृत्यूशी झुंज सुरु असल्याची हृदयद्रावक घटना मध्यरात्री तालुक्यातील सोनेसांगवी ( नं. २ ) येथे घडली. स्वप्नाली ( ४ ) व स्वीटी दीपक साखरे (३) असे मृत चिमुकल्यांची नावे आहेत. तर आई जयश्री दीपक साखरे (३०) यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ( Snake bites on three members of the same family; Two baby girls deaths, mother struggling to life )
दीपक साखरे हे पत्नी आणि चार मुलीसह सोनेसांगवी नं. २ येथे पत्र्याच्या शेडच्या घरात राहतात. मंगळवारी मध्यरात्री जयश्री दीपक साखरे आणि दोन चिमुकल्या मुली स्वप्नाली व स्वीटी या तिघींना सर्पदंश झाला. साप नंतर दीपक साखरे यांच्या अंगावर गेला. सापाच्या स्पर्शाने दीपक यांना जाग आली. त्यांनी उठून पाहिले असता विषारी साप दिसला. त्यांनी लागलीच सापाला मारले. त्यानंतर पत्नी आणि मुलींना सर्पदंश झाल्याचे दीपक यांच्या लक्षात आले. स्वप्नाली आणि स्वीटी या गतप्राण झाल्या तर जयश्री मृत्यूशी झुंज देत होत्या. दीपक यांनी लागलीच पत्नीला अंबाजोगाई येथील स्वामी रामाननंद तिर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दोन चिमुकल्यांच्या मृत्यूच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.