नागपंचमीला सापाला पूजले जाते, मग इतर दिवशी का मारले जाते?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:38 AM2021-08-13T04:38:40+5:302021-08-13T04:38:40+5:30
बीड : भारतीय सणसंस्कृतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सण-उत्सवांच्या माध्यमातून निसर्ग, पर्यावरणाशी समतोल राखण्यासाठी संदेश दिला जातो. यातच नागपंचमीच्या ...
बीड : भारतीय सणसंस्कृतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सण-उत्सवांच्या माध्यमातून निसर्ग, पर्यावरणाशी समतोल राखण्यासाठी संदेश दिला जातो. यातच नागपंचमीच्या दिवशी सापाला पूजले जाते. पण इतर दिवशी तो दिसताच त्याला मारून टाकण्यासाठी अनेकजण सरसावतात. काठी, दगडाने मारून त्याचा जीव घेतला जातो. वास्तविक पाहता साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. मानवसृष्टीदेखील यावर अवलंबून आहे. त्यामुळे सापाला शत्रू नव्हे तर मित्र मानले पाहिजे. बीड जिल्ह्यात २५ प्रजातींचे साप आढळतात. यापैकी पाच विषारी, दोन निमविषारी व १८ बिनविषारी आहेत. १) जिल्ह्यात आढळणारे विषारी साप -
जिल्ह्यात नाग, मण्यार, घोणस, फुरसे हे बिनविषारी साप प्रामुख्याने आढळतात. तर पवळा जातीचा साप दुर्मीळतेने आढळतो.
२) जिल्ह्यात आढळणारे बिनविषारी साप -
जिल्ह्यात अजगर, डुलक्या घोणस, मांडूळ, धामण, धूळनागीण, काळतोंड्या, तस्कर, गवत्या, कवड्या, ठिपक्यांचा कवडा, बार्ड कवड्या, रूखई (शेलारी), विरोळ, कुकरी, रस्टन कुकरी, चित्रांगणायकुळ, वाळा आणि मृदूकाय जातीचे बिनविषारी साप आढळून येतात.
३) साप आढळला तर...
सापाचा प्रकार समजण्याआधी लगेच त्याला मारण्याची वा पकडण्याची घाई करू नये. साप आढळला तर ताबडतोब सर्पमित्रांना संपर्क करून माहिती द्यावी. त्यांच्याकडून साप विषारी आहे की बिनविषारी हे ओळखता येईल. आढळलेल्या सापाला सर्पमित्राच्या मदतीने निसर्गाच्या सानिध्यात सोडता येईल. त्यामुळे प्राणीमृत्यू घडणार नाही आणि सर्प प्रजातींचे रक्षण होऊ शकेल.
४) साप हा तर शेतकऱ्याचा मित्र
सर्पांविषयीचे अज्ञान असल्याने विषारी व बिनविषारी साप ओळखता येत नसल्याने निदर्शनास येणारे अनेक साप नाहक बळी जातात. शहरीकरण वाढल्याने सापांच्या प्रजाती कमी होऊ लागल्या आहेत. शेतातील उंदीर खाऊन साप अन्न वनस्पतींचे रक्षण करतात. साप मानवासाठी औषधी उपयोगासाठी महत्त्वाचा आहे. शेतात पिकांचे रक्षण करणाऱ्या सापाला ‘प्राणदाता’ म्हटले जाते. साप शेेतकऱ्याचा मित्र असल्याने त्याला मारणे योग्य ठरणार नाही.
५) सर्पाशिवाय माणूस जगू शकत नाही. त्यासाठी सर्प वाचविणे गरजेचे आहे. मानवसृष्टीसाठी ते आवश्यक आहे. शाळा, महाविद्यालय, सार्वजनिक कार्यक्रमातून वनविभागाच्या मदतीने आम्ही जनजागृती करीत आहोत. उपायांबाबतचे परिपत्रक वाटप करतो, त्यामुळे प्राथमिक उपचार सुलभ होत आहेत. सर्पदंशाचे प्रमाणही ९५ टक्के घटले आहे.
-- सिद्धार्थ सोनवणे, संचालक, सर्पराज्ञी, तागडगाव, ता. शिरूर, जि. बीड.