म्हणून बीडमध्ये सीईओंच्या दालनात फोडल्या बांगड्या....
By admin | Published: August 4, 2016 02:34 PM2016-08-04T14:34:20+5:302016-08-04T14:34:20+5:30
तीन पाणी योजना राबवूनही पाण्यासाठी पायपीट कायम आहे. त्यामुळे योजनांची चौकशी करावी, या मागणीसाठी जि.प. सीईओ नामदेव ननावरे यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या महिलांनी
ऑनलाइन लोकमत
बीड, दि. ४ : तीन पाणी योजना राबवूनही पाण्यासाठी पायपीट कायम आहे. त्यामुळे योजनांची चौकशी करावी, या मागणीसाठी जि.प. सीईओ नामदेव ननावरे यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या महिलांनी गुरुवारी दालनात बांगड्या फोडून तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी प्रचंड गोंधळ उडाला. पोलिसांनी ५० जणांना अटक केली असून सीईओंच्या दालनाला पोलीस बंदोबस्त दिला आहे.
जिल्हा परिषदेत गुरुवारी सीईओ ननावरे हे आपले नियमित कामकाज करत होते. यावेळी भवानवाडी (ता. बीड) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच उर्मिला हनुमंत जगताप, त्यांचे पती हनुमंत जगताप यांच्यासह ६० ते ७० ग्रामस्थ जि.प. मध्ये दाखल झाले. शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, जि.प. सदस्य किशोर जगताप हेही गावकऱ्यांचा प्रश्न सीईओंसमोर मांडण्यासाठी आले होते. हनुमंत जगताप यांनी सीईओंसमोर निवेदन वाचून दाखवले व त्यांच्याकडे निवेदन सुपूर्द केले. यावेळी सीईओंनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. गावातील पाणीपुरवठा व स्वच्छता समितीवर तुम्ही कायदेशीर कारवाई करा... असा सल्लाही सीईओंनी दिला. मात्र, त्यावर महिलांचे समाधान झाले नाही.
यावेळी सरपंच उर्मिला जगताप व त्यांच्यासोबत आलेल्या काही महिलांनी आपल्याकडील पिशवीत आणलेल्या बांगड्यांचा हार काढून तो सीईओंच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्न केला; परंतु शिवसेना जिल्हाप्रमुख जगताप यांनी त्यांना रोखले. मयावेळी आक्रमक झालेल्या महिलांनी सीईओंच्या टेबलवरील पाण्याचा ग्लास फोडला. शिवाय टेबलवरच बांगड्या फोडल्या. यावेळी बांगड्यांच्या काचा अंगावर उडून आल्याने ननावरे यांच्या तळहाताला व बोटाला किंचीत जखम झाली. त्यांनी खुर्ची सोडून सुरक्षारक्षकाला आवाज दिला. यावेळी एकच गोंधळ उडाला.
सामान्य प्रशासन विभागाचे डेप्युटी सीईओ धनवंतकुमार माळी हे दालनात पोहोचले. त्यांनीही महिलांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत शिवाजीनगर ठाण्याचे निरीक्षक उमेश कस्तुरे हे तेथे पोहाचले. दालनात बांगड्यांच्या काचांचा खच पडलेला होता. सीईओंचे दालन तात्पुरते बंद ठेवण्यात आले. दालनाबाहेर बंदोबस्त वाढविण्यात आला. या प्रकारानंतर सरपंच उर्मिला जगताप, आशा आवाड, गंगू आवाड, इंदू साळुंके, गंगू गिराम, चिंगू सानप व इतर महिला दालनाबाहेर ठाण मांडून होत्या.
उपअधीक्षक गणेश गावडे यांनीही जि.प. मध्ये धाव घेऊन सीईओंच्या दालनाची पाहणी केली. सीईओंनी कायदेशीर कारवाईचा पवित्रा घेतला. त्यानंतर पोलिसांनी मोठ्या वाहनातून सर्व आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत शिवाजीनगर ठाण्यात नेले. एकूण ४५ ते ५० जणांना अटक करण्यात आली. गाडीत चढताना सरपंच उर्मिला जगताप, हनुमंत जगताप यांच्यासह महिलांनी सीईओंच्या विरोधात घोषणाबाजी केली. याबाबत सीईओ ननावरे यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.
नेमके प्रकरण काय?
भवानवाडी (ता. बीड) हे तीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. या गावात भारत निर्माण, राष्ट्रीय पेयजल व घटक योजना ७ ते ७ वर्षांपूर्वी राबविण्यात आल्या होत्या. मात्र, यात लाखोंचा अपहार झाल्यसची तक्रार सरपंच उर्मिला जगताप यांनी सीईओंकडे केली होती. जगताप या शिवसेनेच्या असून ग्रामपंचायत पूर्वी राष्ट्रवादीच्या ताब्यात होती.
पाणीपुरवठा व स्वच्छता समिती पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेलीच आहे. या समितीविरुद्ध जगताप यांची तक्रार आहे. गावात उन्हाळाभर टँकर सुरु होते; परंतु पाऊस पडल्यानंतर महिन्यापूर्वी ते बंद झाले. गावातील एक सार्वजनिक विहीर पाणीपुरवठा व स्वच्छता समितीने बुजविली असून त्यामुळे गावकऱ्यांना पावसाळ्यातही रानोमाळ भटकावे लागत आहे. याबाबत सीईओंकडे तक्रार करुनही चौकशी होत नसल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे.
- आम्ही दहा वेळेस सीईओंना निवेदन दिले होते. त्यांनी दखल घेतली नाही. आज आम्ही निवेदन देण्यास गेलो असता तुम्हीच पाणीपुरवठा समितीवर गुन्हा नोंद करा असे उत्तर सीईओंनी दिले. ते कारवाई करणार नसतील तर ते सीईओपदाच्या खुर्चीत का बसले आहेत? जिल्हा परिषद, पंचायत समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. त्यामुळे चौकशी होत नाही. भवानवाडीतील ग्रामस्थांना पाणी देऊन योजनेत अपहार करणाऱ्यांवर कारवाई करा, एवढीच आमची मागणी आहे.
- उर्मिला जगताप, सरपंच, भवानवाडी ता. बीड.