बारावी परीक्षेत आतापर्यंत ५९ विद्यार्थी रस्टिकेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 12:26 AM2019-03-01T00:26:01+5:302019-03-01T00:27:17+5:30
बीड : महाराष्ट राज्य उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने सुरु असलेल्या बारावीच्या परीक्षेत गुरुवारी दोन जणांवर रस्टिकेटची कारवाई करण्यात आली. ...
बीड : महाराष्ट राज्य उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने सुरु असलेल्या बारावीच्या परीक्षेत गुरुवारी दोन जणांवर रस्टिकेटची कारवाई करण्यात आली. आतापर्यंत ५९ जणांवर अशी कारवाई करण्यात आली. दरम्यान शुक्रवार १ मार्चपासून जिल्ह्यात इयत्ता दहावीच्या परीक्षांना प्रारंभ होत आहे.
२१ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली. ९५ परीक्षा केंद्रावर ३९ हजार १२२ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. २० मार्चपर्यंत या परीक्षा चालणार आहेत. गुरुवारी एमसीव्हीसी व भारतीय संगीत इतिहास विषयाची परीक्षा झाली. आष्टी येथे पं. जवाहरलाल नेहरु विद्यालय परीक्षा केंद्रावर उपशिक्षणाधिकारी हिरालाल कराड यांच्या पथकाने २ विद्यार्थ्यांवर कारवाई केली. तर माजलगाव येथील सिद्धेश्वर महाविद्यालय केंद्रावर शिक्षणाधिकारी (मा.) भगवानराव सोनवणे यांच्या पथकाने एका विद्यार्थ्यावर कारवाई केली.
बुधवारी ६ विद्यार्थ्यांवर रस्टिकेटची कारवाई करण्यात आली. अंबाजोगाई येथील स्वाराती महाविद्यालय केंद्रावर १ तर यशवंतराव चव्हाण महाविद्यालय केंद्रावर २ तर नाथापूर येथील नाथ कनिष्ठ महाविद्यालय केंद्रावर ३ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. सात दिवसात एकूण ५९ विद्यार्थ्यांवर रस्टिकेटची कारवाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यात १५ परिरक्षक केंद्रे निश्चित
राज्य परीक्षा मंडळाच्या वतीने इयत्ता दहावीच्या परीक्षांना श्ुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यात १५२ केंद्र तर १५ परीरक्षक केंद्र आहेत. ४३ हजार ७८७ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. २२ मार्चपर्यंत ही परीक्षा होणार आहे. सकाळी ११ ते २ या वेळेत प्रथम भाषा मराठी, हिंदी, उर्दू विषयाची परीक्षा होत आहे.
बैठकांमुळे परीक्षेवरील नियंत्रण ढासळले
बारावीच्या परीक्षा सुरु होण्याच्या आधीपासून जिल्हा पातळीवरील प्रशासनाच्या विविध विभागांच्या बैठकांमुळे, तसेच व्हिडीओ कॉन्फरन्स व तपासणी दौऱ्यांमुळे परीक्षा नियंत्रणासाठी नेमलेल्या भरारी पथकातील अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर दुसरीकडे कॉपीला आळा घालण्यासाठीचे उपाय तोकडे पडले आहेत. यातच परीक्षा केंद्रांवर नियुक्त बैठे पथकाकडून आतापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.