राज्यात आतापर्यंत ९५ हजार आरोग्यकर्मींना कोरोना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:34 AM2021-01-25T04:34:15+5:302021-01-25T04:34:15+5:30
फोटो २३ बीईडीपी २२ : आरोग्यकर्मीला कोरोना लस देताना. बीड : कोरोना लसीकरणाचा टक्का दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी राज्यभरात ...
फोटो २३ बीईडीपी २२ : आरोग्यकर्मीला कोरोना लस देताना.
बीड : कोरोना लसीकरणाचा टक्का दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी राज्यभरात २० हजार ७४० आरोग्यकर्मींना लस देण्यात आली, तर आतापर्यंत ९५ हजार ९०१ लाभार्थ्यांना लस टोचण्यात आली आहे. गुणतालिकेत पहिल्या पाचमध्ये मराठवाड्यातील हिंगोली, बीड आणि जालना जिल्ह्यांचा समावेश आहे. हिंगोली राज्यात अव्वल आहे.
कोरोनालढ्यात आरोग्यकर्मींनी जीव धोक्यात घालून कर्तव बजावले. त्यामुळे प्राधान्याने त्यांना कोरोना लस दिली जात आहे. १६ जानेवारीपासून राज्यभरात याला सुरुवातही झाली. राज्यात २८४ केंद्रांवर ही लस दिली जात आहे. शनिवारी २८ हजार ४०० चे उद्दिष्ट होते. पैकी २० हजार ७४० लाभार्थ्यांना लस देण्यात आली असून, याची टक्केवारी ७३ एवढी आहे, तर आतापर्यंत १ लाख ४१ हजार ७५० लोकांना लस देणे अपेक्षित होते; परंतु सुरुवातीच्या तांत्रिक अडचणींमुळे ९५ हजार ९०१ लाभार्थीच पूर्ण झाले आहेत. याचा टक्का ६७.७ एवढा आहे.
दरम्यान, राज्यात पहिल्या पाचमध्ये मराठवाड्यातील हिंगोली, बीड आणि जालना जिल्ह्यांचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यात सार्वाधिक ९७.६ टक्के लसीकरण झाले आहे. त्यापाठोपाठ धुळे ९२.९, बीड ९०.५, अमरावती ८८, जालना ८४.३ यांचा क्रमांक लागतो. सर्वांत कमी ४९.१ टक्का रायगड जिल्ह्याचा आहे.
कोट
बीड जिल्हा आरोग्य विभाग पूर्णपणे मेहनत घेत आहे. शुक्रवारी राज्यात अव्वल राहिलो होतोत. शनिवारी राज्यात तिसऱ्या क्रमांकावर असलोत तरी पहिल्या पाचमध्ये असल्याचे समाधान आहे. याचे सर्व श्रेय लस देणारे आणि घेणाऱ्यांना जाते.
डॉ. आर.बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड
...अशी आहे राज्यातील आकडेवारी
लसीकरण केंद्रे- २८४
उद्दिष्ट- १,४१,७५०
लस घेतलेले लाभार्थी- ९५,९०१
टक्केवारी- ६७.७