...तर पीक पंचनाम्यासाठी सुशिक्षित तरुणांची मदत घेऊ; संपामुळे कृषीमंत्री सत्तारांचे संकेत

By शिरीष शिंदे | Published: March 18, 2023 12:53 PM2023-03-18T12:53:19+5:302023-03-18T12:54:42+5:30

संप मिटला नाही तर पर्यायी व्यवस्था करावी लागेल, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती

...so let's take the help of agri-educated youth for Crop Panchnamya; Agriculture Minister Abdul Sattar's hints at alternative arrangements due to strike | ...तर पीक पंचनाम्यासाठी सुशिक्षित तरुणांची मदत घेऊ; संपामुळे कृषीमंत्री सत्तारांचे संकेत

...तर पीक पंचनाम्यासाठी सुशिक्षित तरुणांची मदत घेऊ; संपामुळे कृषीमंत्री सत्तारांचे संकेत

googlenewsNext

बीड: राज्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात आहे. कृषी सहायक, ग्रामसेवक व तलाठी संपामध्ये असल्याने पीक पंचनाम्यासाठी थोडी अडचण आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची उपलब्धता नसेल तर पंचनामे करण्यासाठी बीएसस्सी ॲग्री व इतर शिकलेल्या तरुणांकडून काही काम करुन घेता येईल का ? अशी विचारणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आमच्या लोकांनी, शासकीय कर्मचाऱ्यांनी संप परत घेतला नाही तर पर्यायी व्यवस्था करावी लागेल अशी स्पष्ट भूमिका राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मांडली.

बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर शनिवारी सकाळी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्यावतीने मिलेट दौडच्या उद्घाटन प्रसंगी प्रसिद्धी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. पुढे मंत्री सत्तार म्हणाले की, राज्यातील एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांचे नुकसान झाले असल्याने काही ठिकाणी पीक पंचनाम्यांची अंमलबजावणी सुरु आहे तर काही ठिकाणी कर्मचारी नसल्याने अडचण आहे. पंचनाम्यासाठी यंत्रणा नसेल किंवा तुमच्याकडे कर्मचारी येत नसतील तर अशा संकटाच्या काळामध्ये बीएसस्सी ॲग्री व इतर शिकलेल्या तरुणांकडून काही काम करुन घेता येईल का ? अशी विचारणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आमच्या लोकांनी संप परत घेतला नाही तर आम्हाला पर्यायी व्यवस्था करावी लागेल. नुकसानीची दक्षता घेण्याचा आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे, त्यावर विचार सुरु असून निर्णय घेणार आहे. मात्र आस्मानी संकटाच्या वेळी आपल्या शेतकरी बांधवांना वेठीस धरु नये असे आवाहन कृषी मंत्र्यांनी केले.

पीक पंचनामे झाले नाही तर त्याची शेतकरी मी जाहीर केलेल्या चार क्रमांकावर कॉल करु शकतील. त्या संदर्भाने एक प्रेस नोट तयार केली आहे. तसेच एक सहाजणांची टीम स्थापन केली असून त्यातील सदस्य शेतकऱ्यांना पीक पंचनाम्यासाठी मदत करतील असेही कृषी मंत्री सत्तार म्हणाले.

Web Title: ...so let's take the help of agri-educated youth for Crop Panchnamya; Agriculture Minister Abdul Sattar's hints at alternative arrangements due to strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.