...तर प्रत्येक चौकात फाशीचे कार्यक्रम आयोजित करा; नोटबंदीवरून राऊत यांचा मोदींवर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 06:19 PM2023-05-20T18:19:34+5:302023-05-20T18:21:09+5:30
'नोटबंदी केल्यामुळे काळा पैसा येईल ही प्रधानमंत्री मोदी यांची पहिली घोषणा होती. मात्र देशात १ रुपया तरी आला का?'
परळी: 'नोटबंदी जर अयशस्वी ठरली तर मला भर चौकात फाशी द्या', असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. “ आता प्रत्येक चौकाचौकात लोकांनी जाहीर फाशीचा कार्यक्रम आयोजित केला पाहिजे. लोकांनी पंतप्रधानांची इच्छा पूर्ण केली पाहिजे.'' अशी खळबळजनक प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी येथे दिली. त्यांनी महाप्रबोधन यात्रेनिमित्त बीडकडे जात असताना परळी येथे माध्यमांशी संवाद साधला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज बीड येथे गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहिली. यावेळी गोपीनाथ गडावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शुक्रवारी आरबीआयने देशातील २ हजार रुपयांची नोट बंद करण्यात आल्याचे जाहीर केले. ३० सप्टेंबरपर्यंत बँकेत २ हजारांच्या नोटा जमा करता येणार आहेत. या पार्श्वभूमीवर खा. राऊत यांना नोटबंदीवर प्रश्न विचारण्यात आला. यावेळी खा. राऊत म्हणाले, नोटबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचं नुकसान केलं, बेरोजगारी वाढवली, महागाई वाढवली, व्यापार उद्योग व लघुउद्योग बंद पडले. नोटबंदी केल्यामुळे काळा पैसा येईल ही प्रधानमंत्री मोदी यांची पहिली घोषणा होती. मात्र देशात १ रुपया तरी आला का? दहशतवाद्यांना होणारा काळ्या पैशांचा पुरवठा बंद होईल असे ते म्हणाले होते मात्र काश्मीरला जाऊन बघा काय परिस्थिती आहे, असा सवाल खा. राऊत यांनी केला.
प्रत्येक चौकात फाशीचे कार्यक्रम करा
नोटबंदी जर अयशस्वी ठरली तर मला भर चौकात फाशी द्या, असे प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटले होते. नोटबंदीमुळे देशात आता प्रत्येक चौकाचौकात लोकांनी जाहीर फाशीचा कार्यक्रम आयोजित केला पाहिजे. लोकांनी पंतप्रधानांची इच्छा पूर्ण केली पाहिजे. मी या देशात किती लोकांचं नुकसान केलं हे त्यांना स्वतःलाच कळायला पाहिजे, अशी सणसणीत टीका खा. राऊत यांनी केली. तसेच गोपीनाथ मुंडे असते तर शिवसेना - भाजपा युती तुटली नसती असेही ते म्हणाले.
आज बीड येथे अंधारे- राऊत एकाच मंचावर
बीड येथे ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा कार्यक्रम आहे. यावेळी ठाकरे गटाचे दोन फायरब्रांड नेते खा. संजय राऊत आणि उपनेत्या सुषमा अंधारे एकाचा मंचावर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी बीडकडे परळीमार्गे जात असताना खासदार संजय राऊत व उपनेत्या सुषमा अंधारे यांचे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसवतीने वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. येथील राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात शिवसेनेच्या परळी शाखेच्यावतीने खा. राऊत यांचे जेसीबीतून फुले उधळून जोरदार स्वागत करण्यात आले.