...म्हणून फिरविली विद्यार्थ्यांनी आयटीआयकडे पाठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:35 AM2021-08-26T04:35:42+5:302021-08-26T04:35:42+5:30

बीड : आयटीआय प्रवेशासाठी अर्जनोंदणीत यंदा घट झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे ‘प्रवेश प्रोत्साहन अभियान’ राबविण्यात येत आहे. यंदा दहावीचा ...

... so students turn to ITI! | ...म्हणून फिरविली विद्यार्थ्यांनी आयटीआयकडे पाठ!

...म्हणून फिरविली विद्यार्थ्यांनी आयटीआयकडे पाठ!

Next

बीड : आयटीआय प्रवेशासाठी अर्जनोंदणीत यंदा घट झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे ‘प्रवेश प्रोत्साहन अभियान’ राबविण्यात येत आहे. यंदा दहावीचा निकाल मूल्यांकनावर लागल्याने निकालाचा टक्का फुगला आहे. मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने स्पर्धा होईल असे वाटत असताना अपेक्षेच्या तुलनेत विद्यार्थ्यांची नोंदणी कमी झाली आहे. तर अनपेक्षितपणे जास्त गुण मिळाल्याने अनेक विद्यार्थी कॉलेजमध्ये शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत आहेत. त्यामुळे आयटीआयकडे नोंदणी करणाऱ्यांचे प्रमाण सध्यातरी कमी दिसत आहे. ३१ ऑगस्टपर्यंत नोंदणी करता येणार असल्याने आठवडाभरानंतर स्थिती स्पष्ट होणार आहे. कोरोनामुळे शिकण्याची मानसिकता अजूनतरी रुळावर आली नसल्याने विद्यार्थ्यांनी आयटीआयकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे. नोंदणी अर्ज कमी आल्याने प्रत्येक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून प्रवेश प्रोत्साहन अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातून आयटीआयच्या प्रशिक्षणाबाबत प्रसिद्धी आणि जनजागृती केली जात आहे.

जिल्ह्यातील शासकीय आयटीआय - १२

एकूण प्रवेश क्षमता - २,१६६

खासगी आयटीआय - १३

एकूण प्रवेश क्षमता - १,२८०

आतापर्यंत आलेले अर्ज - ८,६००

गतवर्षीपेक्षा कमी प्रतिसाद

बीड जिल्ह्यात मागील वर्षी आयटीआयच्या २० टक्के जागा रिक्त होत्या. एकूण १० हजार ५०० अर्ज आले होते. कोरोनाकाळात ही परिस्थिती होती. आता अनलॉक झाले आहे. कोरोनाही ओसरला आहे. तरीदेखील २४ ऑगस्टपर्यंत ८ हजार ६०० अर्ज आले असून, ८ हजार ५०० अर्ज कन्फर्म झाले आहेत. आठ दिवसांत अर्जांचा आकडा किती वाढतो याकडे लक्ष लागले आहे.

...म्हणून घटले आयटीआयचे विद्यार्थी

दहावीच्या परीक्षेत जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान शाखेतून डॉक्टर, इंजिनीअर होण्याची ऊर्मी निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे गावाजवळच कॉलेज असल्याने गाव सोडून वसतिगृहात राहून शिकवायला पाठविण्याबाबत पालक सद्य:स्थितीत उत्सुक नाहीत. आपली मुले आपल्याजवळ राहावीत, ही मानसिकता असल्याने आयटीआयकडे जाण्याचे प्रमाण कमी दिसते.

- सतीश कुलकर्णी, तज्ज्ञ, बीड.

कोरोनामुळे मागील दीड वर्षात औद्योगिक आस्थापनांमध्ये आलेला विस्कळीतपणा, ॲप्रेंटीसशिपमध्ये लागलेल्या मुलांची कमी संख्या, मॅकेनिकल वगळता इतर ट्रेडमध्ये नसलेली मागणी, आयटीआय पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना स्वबळावर उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाची विशेष योजना नसणे आदी कारणांमुळे आयटीआयचे विद्यार्थी घटले आहेत.

- आनंद देशपांडे, तज्ज्ञ, बीड.

विद्यार्थी म्हणतात-

नोकरीची हमी, रोजगार संधी तसेच स्वयंरोजगाराच्या दृष्टीने मी आयटीआयच्या प्रशिक्षणासाठी नोंदणी केली आहे. कमी कालावधीत रोजगार मिळू शकेल. त्यामुळे दहावीचा निकाल लागताच मी आयटीआयसाठी नोंदणी करून अर्ज कन्फर्म केला आहे.

- प्रथमेश कानडे, विद्यार्थी.

-----------

आयटीआयमधून ट्रेड करण्याचाही विचार असल्याने नोंदणी केलेली आहे. मात्र मला दहावीला चांगले गुण मिळाले आहेत. त्यामुळे विज्ञान शाखेतून प्रवेश घेऊन बारावीनंतर इंजिनीअरिंगचे शिक्षण घेण्याचा मानस आहे. अकरावी प्रवेशाची तयारी केली आहे.

- स्वप्निल शिराळकर, विद्यार्थी.

Web Title: ... so students turn to ITI!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.