समाजकल्याणच्या ४६ आश्रमशाळा होणार ‘डिजिटल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:24 AM2019-05-29T00:24:13+5:302019-05-29T00:24:47+5:30
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत असणाऱ्या जिल्ह्यातील ४६ शाळा यावर्षी डिजीटल झाल्या आहेत. यावर्षीपासून या शाळांमध्ये सेमी इंग्रजीची सुविधा देण्यात आली असून परिसरात तंबाखू, गुटखाबंदीही करण्यात आली.
बीड : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत असणाऱ्या जिल्ह्यातील ४६ शाळा यावर्षी डिजीटल झाल्या आहेत. यावर्षीपासून या शाळांमध्ये सेमी इंग्रजीची सुविधा देण्यात आली असून परिसरात तंबाखू, गुटखाबंदीही करण्यात आली. सहायक आयुक्त डॉ.सचिन मडावी यांनी मंगळवारी सर्व मुख्याध्यापकांची बैठक घेऊन यासंदर्भात सूचना केल्या आहेत. यामुळे आश्रमशाळांची गुणवत्ता वाढणार असून बीड जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रात उंचावणार आहे.
जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा तसेच विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढून त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, या उद्देशाने आयुक्त डॉ.मडावी यांनी हा निर्णय घेतला आहे. मंगळवारी त्यांनी याबाबत तातडीची सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक बोलावून मार्गदर्शन व आदेश दिले. यामध्ये शाळेच्या १०० मीटर परिसरात तंबाखू, गुटखा बंदी, शाळा रंगरंगोटी करणे, सकाळी ९ ते सायंकाळी साडे चार यावेळेत शाळा सुरू ठेवणे, सर्व शिक्षक, विद्यार्थ्यांना गणवेश बंधनकारक करणे आदींचा समावेश आहे. पहिल्यांदाच अशाप्रकारे आश्रमशाळांचा कायापालट होत असून या शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे शिक्षण मिळणार असल्याने विद्यार्थ्यांची संख्याही वाढणार आहे. तसेच त्यांची गुणवत्ता वाढून जिल्ह्याचे नावही उंचावणार आहे.
शनिवारी दप्तरमुक्त शाळा
या आश्रमशाळांमध्ये प्रत्येक शनिवारी एकही विद्यार्थी दप्तर घेऊन येणार नाही. तसेच प्रत्येक महिन्याला सामान्य ज्ञान चाचणी घेण्यात येणार आहे.
यासह सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांसह विविध कार्यक्रम घेतले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी वाढेल, असा विश्वास सहा.आयुक्त डॉ.सचिन मडावी यांनी व्यक्त केला.