सोसायटीची कर्ज वसुली खिशात घातली,विनापरवानगी पगारही वाढवली;सचिवाविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 04:07 PM2022-02-17T16:07:39+5:302022-02-17T16:09:49+5:30
२ लाख ६९ हजार ९०९ रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार लेखा परीक्षणात उघडकीस आला
केज ( बीड ) : सचिवाने संचालक मंडळाला विश्वासात न घेता जास्तीचा पगार घेणे आणि कर्ज वसुलीचा भरणा न करता २ लाख ६९ हजार ९०९ रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार तालुक्यातील पैठण येथील सेवा सहकारी सोसायटीत उघडकीस आला आहे. लेखापरीक्षणात हा अपहार उघडकीस आला. याप्रकरणी सचिव राजेंद्र विठ्ठल गायकवाड याच्याविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
केज तालुक्यातील पैठण येथील सेवा सहकारी सोसायटीचे १ एप्रिल २०११ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीचे लेखापरीक्षण एतेसामोद्दीन नवाबोद्दीन काझी यांनी केले. यात सोसायटी सचिव राजेंद्र विठ्ठल गायकवाडने पदाचा गैरवापर करीत मासिकवेतन ७ हजार रुपयावरून संचालकांची मंजुरी न घेता १० हजार रुपायांप्रमाणे घेतले. तसेच कर्जदार सभासदांकडून १ एप्रिल २०११ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत वसूल करण्यात आलेल्या १ लाख ८४ हजार ९०९ रुपायांची रक्कम भरणा केली नसल्याचे उघडकीस आली.
वेतनातून ८५ हजार रुपये व कर्ज वसुलीची १ लाख ८४ हजार ९०९ रुपये असा २ लाख ६९ हजार ९०९ रुपयांचा अपहार केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर लेखा परीक्षक एतेसामोद्दीन नवाबोद्दीन काझी यांच्या तक्रारीवरून सोसायटीचे सचिव राजेंद्र विठ्ठल गायकवाड ( रा. बनसारोळा ता. केज ) याच्याविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार रामधन डोईफोडे करत आहेत.