सोळंके कारखान्याच्या कर्मचाऱ्यांवर ऐन दिवाळीत उपासमारीची वेळ; सहा महिन्यांचे वेतन थकले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 07:55 PM2024-10-31T19:55:29+5:302024-10-31T19:56:36+5:30
अनेक वर्षे कधीही कर्मचाऱ्यांचे वेतन थकलले नव्हते. परंतु मागील दोन वर्षांपासून या कारखान्यातील कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी आहेत.
माजलगाव : तेलगाव येथील लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन मागील सहा महिन्यांपासून थकले आहे. यामुळे ऐन दिवाळीत या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
तेलगाव येथे कै. सुंदरराव सोळंके यांनी ३२ वर्षांपूर्वी कारखान्याची उभारणी केली होती. मागील ३० वर्षे हा कारखाना सुरळीत चालला होता. अनेक वर्षे कधीही कर्मचाऱ्यांचे वेतन थकलले नव्हते. परंतु मागील दोन वर्षांपासून या कारखान्यातील कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी आहेत. मागील ६ ते ७ महिन्यांपासून येथील सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे.
मागील तीन-चार महिन्यांत वेगवेगळे सणउत्सव असतानादेखील या कर्मचाऱ्यांना वेतन मिळू शकलेले नाही. सध्या दिवाळीचा सण सुरू असतानादेखील या कर्मचाऱ्यांना केवळ दोनच महिन्यांचे वेतन देण्यात आले. यामुळे सर्व कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. सहा महिन्यांपासूनची उसनवार, इतरांची देणी द्यायची कशी अन् सण साजरा करायचा कसा? असा सवाल कर्मचारी, कामगार करीत आहेत. तसेच मागील दहा महिन्यांपासून वर्तमानपत्रांच्या जाहिरातीची बिलेदेखील थकलेली आहेत.
एकीकडे मागील ३२ वर्षांत या कारखान्याने एकही हंगाम गाळपाविना बंद ठेवलेला नव्हता. याचा विक्रम असल्याचे सांगत कारखान्याचे चेअरमन, संचालक मंडळ, कर्मचारी ढोल बडवत असतात. या कारखान्याकडे साखर, इथेनॉल, बग्यास, वीज निर्मिती मोठ्या प्रमाणात होत असताना यातून मिळणारा पैसा जातो कुठे असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
मुख्य कार्यकारी संचालकांचा हेकेखोरपणा?
काही महिन्यांपूर्वी या कारखान्यात रुजू झालेले मुख्य कार्यकारी संचालक हे येथील कर्मचारी, शेतकरी, सभासदांच्या समस्या, त्यांच्या प्रश्नांचे निरसन करत नसून त्यांचीच बॉसगिरी सहन करावी लागते, अशा तक्रारी ऐकावयास मिळतात. यामुळे कर्मचारीदेखील वैतागले असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.
दोन महिन्यांचे वेतन केले
या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे वेतन देणे मागील सहा महिन्यांपासून थकले होते. परंतु दोन दिवसांपूर्वीच दोन महिन्यांचे वेतन कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.
- रवींद्र बडगुजर, मुख्य कार्यकारी संचालक, सोळंके सहकारी साखर कारखाना, तेलगाव.