१७ गोण्या कांदा विकला; हाती पडला रुपया!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 06:11 AM2023-03-02T06:11:13+5:302023-03-02T06:12:10+5:30
मिळाला केवळ २ रुपये किलोचा भाव
- नितीन कांबळे
लोकमत न्यूज नेटवर्क
कडा (जि. बीड) : बाजारपेठेत कांद्याची विक्रमी आवक असली तरी बाजारभाव नसल्याने शेतकरी हतबल आहे. हजारो रुपये खर्च करून मेहनत केलेल्या कांद्याने वांदा केल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. १७ गोण्या विकून केवळ एक रुपया हातात आल्याचे आष्टी तालुक्यातील बावी येथील शेतकऱ्यांच्या बाबतीत घडले आहे. नामदेव पंढरीनाथ लटपटे यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदा दहा, पाचची पडतळ देईल या हेतूने घेतला.
आमची थट्टा तरी थांबवा...
तीन महिन्यांपूर्वी २० गुंठे क्षेत्रात कांदा लागवड केली, रोप, फवारणी, खते, मजुरी यासाठी ३० हजार खर्च झाला. अवघा दोन रुपये किलोचा भाव मिळाला. हातात एक रुपया आला. मायबाप सरकारने योग्य बाजारभाव द्यावा. नाहीतर होणारी थट्टा थांबवावी.
- नामदेव लटपटे, शेतकरी