२९ ग्रामपंचायतींमध्ये घनवृक्षलागवड; दोन ठिकाणी औषधी वनस्पतींचे वन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:25 AM2021-06-05T04:25:02+5:302021-06-05T04:25:02+5:30

बीड : विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धन तसेच नैसर्गिक प्राणवायू वृद्धीसाठी ‘एक व्यक्ती, तीन झाड’ ...

Solid tree planting in 29 gram panchayats; Medicinal forests in two places | २९ ग्रामपंचायतींमध्ये घनवृक्षलागवड; दोन ठिकाणी औषधी वनस्पतींचे वन

२९ ग्रामपंचायतींमध्ये घनवृक्षलागवड; दोन ठिकाणी औषधी वनस्पतींचे वन

Next

बीड : विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धन तसेच नैसर्गिक प्राणवायू वृद्धीसाठी ‘एक व्यक्ती, तीन झाड’ या वृक्षलागवड उपक्रमाची जिल्हा परिषदेने जोरदार तयारी केली असून, ५ जून रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये या मोहिमेचा शुभारंभ होत आहे. शुभारंभासाठी १०३१ ग्रामपंचायतीअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये किमान शंभर झाडांची लागवड केली जाणार असून, २९ ग्रामपंचायतींमध्ये पाच गुंठे ते दहा गुंठे क्षेत्रात घनवृक्षलागवड केली जाणार आहे. अशी सुमारे किमान एक लाख दहा हजार वृक्षलागवड केली जाणार आहे. यासाठी लागणारी रोपे सामाजिक वनीकरण विभाग, वनविभाग आणि कृषी विभागातील रोपवाटिकेतून ग्रामपंचायतींच्या निधीतून प्राप्त करून घेणार आहेत. जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार हे माजलगाव, परळी तालुक्यातील नित्रुड, सिरसाळा, गाढे पिंपळगाव आणि टोकवाडी येथे मोहीम शुभारंभास उपस्थित राहणार आहेत. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी हे आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यात तर ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दादासाहेब वानखेडे हे बीड, गेवराई, वडवणी तालुक्यात शुभारंभ करणार आहेत. उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी हे अंबाजोगाई आणि धारूर येथील शुभारंभ कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. सर्व निसर्गप्रेमी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापकांनी जास्तीत जास्त झाडे लावण्याच्या मोहिमेत सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पर्यावरण शुद्धतेसाठी सहभाग नोंदवा

पर्यावरण शुद्धतेच्या कामात सर्वांनी हातभार लावावा तसेच स्वतः रोपे लावावीत अथवा ग्रामपंचायतीला वृक्षरोपे दान स्वरूपात देण्याचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष शिवकन्या सिरसट, उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.

गतवर्षीच्या झाडांचाही वाढदिवस

५ जून रोजी गतवर्षी लावलेल्या झाडांचे आणि घन वृक्षलागवडीचे वाढदिवस साजरे केले जाणार आहेत, तर परळी तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथे आयुर्वेदिक वनस्पतींच्या वननिर्मितीचा शुभारंभ होणार आहे. अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा येथे पेरू वन, तर गिरवली आपेट येथे औषधी वनस्पती लागवड आणि घनवृक्षलागवड केली जाणार आहे.

अकरा संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती

जिल्ह्यातील या वृक्षलागवड मोहिमेसाठी जिल्हा परिषद स्तरावर प्रत्येक तालुक्यासाठी आणि गावासाठी एक याप्रमाणे अकरा संपर्क अधिकारी नियुक्त केले असून, त्यांनी गावात कार्यक्रमात उपस्थित राहून वृक्षलागवड करणे बंधनकारक केले आहे. त्यांच्या केलेल्या कामाचा अहवाल सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर होणार आहे.

-------

Web Title: Solid tree planting in 29 gram panchayats; Medicinal forests in two places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.