कोणाला रुग्णालयात जायचं, तर कोणाला अंत्यसंस्काराला; पण बसच बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:25 AM2021-04-29T04:25:26+5:302021-04-29T04:25:26+5:30
बीड : सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व बसेस जागेवरच उभ्या आहेत. याचे आर्थिक नुकसान राज्य परिवहन ...
बीड : सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व बसेस जागेवरच उभ्या आहेत. याचे आर्थिक नुकसान राज्य परिवहन महामंडळाला तर होतेच; शिवाय, प्रवाशांनाही त्रास होत आहे. रुग्णालयात अथवा साधे अंत्यसंस्काराला जायचे असले तरी वाहन मिळत नसल्याने सामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. वेळप्रसंगी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून यात आर्थिक लूट होत आहे.
राज्यात सर्वत्र कोराेनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. लोकांना आवाहन करूनही लोक काळजी घेत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. हाच धागा पकडून शासनाने कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लोकांचे घराबाहेर पडणे बंद झाले. असे असले तरी आजही काही लोकांना अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडावे लागत आहे. रुग्णालय असो वा अंत्यसंस्कार; त्यासाठी त्यांना वाहनेच भेटत नसल्याचे समोर आले आहे. राज्य परिवहन महामंडळाने बसेसना प्रतिसाद नसल्याने त्या जागेवरच उभ्या केल्या आहेत. त्यामुळे सामान्य प्रवाशांना अडचणी येत आहेत. त्यामुळे त्यांचे हाल होत आहेत.
औरंगाबादला जाणारे जास्त प्रवासी
बीडहून विविध कामांसाठी औरंगाबादला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते. आजही बसेस बंद असल्या तरी खासगी वाहने औरंगाबादच्या दिशेने मोठ्या प्रमाणात धावताना दिसतात. तसेच परभणी, लातूर, अहमदनगर या मार्गांवरही बसेस जास्त धावतात.
रोज ४० लाखांपेक्षा जास्त नुकसान
जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळा ५५० पेक्षा जास्त बसेस आहेत. याद्वारे महामंडळाला रोज जवळपास ४० ते ४५ लाख रुपये उत्पन्न मिळत असते. परंतु, सध्या बसेस जागेवरच असल्याने एवढा मोठा तोटा सहन करावा लागत आहे.
---
जिल्ह्यातील एकूण बसेस ५९५
चालू बसेस ०
रोज आर्थिक नुकसान ४० ते ४५ लाख
जिल्ह्यातील एकूण आगारे ८