कोणी बेड, कोणी व्हेंटिलेटर दिले, आम्ही तर आमचं आयुष्य देतोय..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:25 AM2021-05-28T04:25:20+5:302021-05-28T04:25:20+5:30

अविनाश कदम आष्टी : कल्पना करा, या क्षणाला मोठा तांत्रिक बिघाड झाला आणि राज्य विजेविना अंधारात बुडाले तर?, ...

Someone gave a bed, someone gave a ventilator, we are giving our lives ..! | कोणी बेड, कोणी व्हेंटिलेटर दिले, आम्ही तर आमचं आयुष्य देतोय..!

कोणी बेड, कोणी व्हेंटिलेटर दिले, आम्ही तर आमचं आयुष्य देतोय..!

Next

अविनाश कदम

आष्टी : कल्पना करा, या क्षणाला मोठा तांत्रिक बिघाड झाला आणि राज्य विजेविना अंधारात बुडाले तर?, व्हेंटिलेटर बंद होतील, ऑक्सिजन मशीन बंद होतील, आयसीयूमधील यंत्रणा बंद पडतील अन‌् त्यावर विसंबलेले श्वासही. मात्र, वीज कर्मचारी दक्ष राहून त्यांचे कर्तव्य पार पाडत आहेत. कोणी बेड दिले, कोणी व्हेंटिलेटर दिले, आम्ही आमचं आयुष्य देतोय, अशी प्रतिक्रिया वीज कर्मचाऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.

कोरोनाच्या या जीवघेण्या संकटातही महावितरणचे वीज कर्मचारी नियमांचे पालन करीत जिवाची बाजी लावून आपले कर्तव्य पार पाडत आहेत. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सेवेत असलेली सर्व काेविड रुग्णालये, ऑक्सिजन पुरवठादार कंपन्या यांच्यासह सर्व अत्यावश्यक सेवा तसेच कोरोना संसर्ग टाळण्यासाठी घरी राहून कर्तव्य पार पाडणाऱ्या ग्राहकांना सुरळीत व अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी आष्टी तालुक्यातील महावितरणचे उपकार्यकारी अधिकारी, अभियंते, तंत्रज्ञ, यंत्रचालक व सर्व कर्मचारी आणि बाह्यस्रोत कामगार ग्राहक सेवेत सज्ज आहेत.

शासकीय तसेच खासगी रुग्णालये, कोविडचे विशेष कक्ष, विलगीकरण कक्ष, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अत्यावश्यक सेवांना सुरळीत व अखंडित वीजपुरवठा मिळेल, याची खबरदारी महावितरणकडून घेतली जात आहेत. महावितरणच्या घरगुती ग्राहकांना अखंडित सेवा देण्याचे काम सुरू आहे. मुख्य अभियंत्यापासून ते सहायक अभियंत्यापर्यंत व सर्व अधिकारी यासाठी आपापल्या कार्यालयांमध्ये कार्यरत आहेत. वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी या कोरोनाच्या काळात महावितरणचे कर्मचारी कार्यरत आहेत.

रात्री-बेरात्री करावी लागतात कामे

चोवीस तासांत कधीही रात्रीच्या वेळी फोन आल्यानंतर तत्काळ दुरुस्तीसाठी जावे लागते. सोबतचे १० सहकारी पॉझिटिव्ह येऊन त्यामधील ८ जण तंत्रज्ञ पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. बाकी दोनजणांवर उपचार सुरू आहेत. आता वादळी वाऱ्यामुळे कुठे ना कुठे बिघाड होतच आहे. कमी मनुष्यबळातही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ वीज दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.

- शिवाजी गोरे, वरिष्ठ तंत्रज्ञ आष्टी.

१०० टक्के उपस्थितीतच करावे लागते काम

महावितरण कर्मचारी, अधिकारी, लाईन स्टाफने कोरोना काळात, वादळात अनेक अडचणींवर मात करत ग्राहकांना सुरळीत वीज पुरवली. वीज सेवा ही अत्यावश्यक असतानाही व संकटाच्या काळात काम करूनही त्यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा मिळालेला नाही. सरकारने शासकीय कार्यालयांत १५ टक्के उपस्थिती सांगितली आहे. मात्र, महावितरण कर्मचाऱ्यांना १०० टक्के उपस्थितीतच काम करावे लागते. यामुळेच कुठे बिघाड झाल्यास तत्काळ दुरुस्त करता येते, तर आमच्या कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा मिळावा, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

- प्रवीण पवार, उपकार्यकारी अभियंता आष्टी.

असे आहे मनुष्यबळ

आष्टी तालुक्यातील महावितरण कर्मचारी

उपकार्यकारी अभियंता १, सहायक अभियंते ५, कनिष्ठ अभियंते २, जनमित्र ७४, यंत्रचालक ६४,अतांत्रिक कर्मचारी ८.

Web Title: Someone gave a bed, someone gave a ventilator, we are giving our lives ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.