कोणी पेन्सिल, खडू नाकात घालतंय, कुणाच्या कानात हरभरा, तर कोणी नाणे गिळतंय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:39 AM2021-09-08T04:39:53+5:302021-09-08T04:39:53+5:30
बीड : लहान मुले काय करतील याचा नेम नाही. अशीच माहिती जिल्हा रुग्णालयातील कान-नाक-घसातज्ज्ञांकडून घेतली. यात मुलांनी नाकात पेन्सिल, ...
बीड : लहान मुले काय करतील याचा नेम नाही. अशीच माहिती जिल्हा रुग्णालयातील कान-नाक-घसातज्ज्ञांकडून घेतली. यात मुलांनी नाकात पेन्सिल, खडू घातल्याचे समोर आले. तर कोणी कानात हरभरा घातला होता. काही चिमुकल्यांनी तर पैशाचे नाणेही गिळल्याचे प्रकार उघडकीस आले. या सर्वांवर सुखरूप उपचार केले; परंतु पालकांनी या मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे.
जिल्हा रुग्णालयात मागील दीड वर्षात लहान मुलांनी खडू, पेन, पेन्सिल नाकात घातल्याचे रुग्ण आले. तसेच काहींनी ज्वारी, बिया, चिंचोका, हरभरा, कपड्याचे मणी, पैशाचे नाणे गिळल्याच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेष म्हणजे हे सर्व रुग्ण ६ वर्षांच्या आतील होते. या मुलांनी खेळताना हे सर्व केल्याचे सांगण्यात येत असले तरी पालकांकडून होणारे दुर्लक्ष हेच याचे मूळ कारण असल्याचे समजते. आलेल्या रुग्णांवर मात्र, जिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञांनी सुखरूप उपाचार करून त्यांना ठणठणीत केले. हे जिल्हा रुग्णालयाचे यश असले तरी पालकांनी मुलांबाबत काळजी घेणे गरजेचे आहे.
नाणे गिळलेल्या मुलाला अंबाजोगाईला रेफर
जिल्हा रुग्णालयात आतापर्यंत पैशाचे नाणे गिळल्याची अनेक रुग्ण आली. त्यांच्यावर सुखरूप उपचार केले; परंतु एका मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात रेफर करण्यात आले होते. इतरांना ओपीडीमध्येच उपचार करून ठणठणीत केले होते.
अशी घ्या काळजी
लहान मुलांना खेळताना त्यांच्याजवळ छोटी व टोकदार वस्तू ठेवू नये. दोन मुले खेळत असतील तर एकमेकांच्या तोंडात, कान, नाकात काही घालणार नाहीत, यासाठी लक्ष ठेवावे. तिक्ष्ण वस्तू न देता मऊ वस्तू खेळण्यासाठी द्याव्यात, यामुळे जखम होण्याची शक्यता कमी असते. मुलांकडे लक्ष देण्यासाठी एक माणूस कायम राहावा, असे नियोजन करावे.
--
नाकात खडू, पेन्सिल, कानात हरभरा, ज्वारी, कपड्याचे मणी घातल्याचे रुग्ण आले होते. त्यांच्यावर सुखरूप उपचार केले. एका मुलाने नाणे गिळले होते. त्याला अंबाजोगाईला रेफर केले होते. हे सर्व लहान मुले होते. मुले काय करतील याचा नेम नसतो, त्यामुळे पालकांनी त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
-डॉ. मीनाक्षी साळुंके, कान-नाक-घसातज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय, बीड
070921\07_2_bed_7_07092021_14.jpeg
डॉ.मिनाक्षी साळुंके