वंशाच्या दिव्यासाठी काही पण... ‘त्या’ सासूने आणल्या होत्या सहा सुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:39 AM2021-08-14T04:39:08+5:302021-08-14T04:39:08+5:30

बीड: वंशाला दिवा पाहिजे म्हणून सुनेला भाच्यासोबत अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचे धक्कादायक प्रकरण आष्टी तालुक्यात उघडकीस आले ...

Something for the family lamp but ... ‘that’ mother-in-law had brought six brides | वंशाच्या दिव्यासाठी काही पण... ‘त्या’ सासूने आणल्या होत्या सहा सुना

वंशाच्या दिव्यासाठी काही पण... ‘त्या’ सासूने आणल्या होत्या सहा सुना

Next

बीड: वंशाला दिवा पाहिजे म्हणून सुनेला भाच्यासोबत अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचे धक्कादायक प्रकरण आष्टी तालुक्यात उघडकीस आले होते. या प्रकरणातील सासूने वंशवेल वाढावी म्हणून आपल्या तीन मुलांना सहा सुना आणल्याची बाब आता समोर आली आहे. दरम्यान, पीडित महिला साडेपाच महिन्यांची गर्भवती आहे. अवघडलेल्या स्थितीत तिला कोर्ट, पोलीस ठाण्यांत खेटा मारण्याची वेळ आली आहे.

आष्टी तालुक्यातील जळगाव येथील कडा कारखाना परिसरात राहणारे एक कुटुंब गावोगावी नंदीबैल नेऊन भिक्षा मागून उदरनिर्वाह भागवते. तीन मुले, आई- वडील असा हा परिवार. तिघेही विवाहित मात्र पाळणा हलत नव्हता. त्यामुळे सासूने एका मुलाला तीन सुना आणल्या, पण त्या तिघीही नांदल्या नाहीत. दुसऱ्या मुलाच्या पत्नीने काडीमोड घेतला असून हे प्रकरण न्यायालयात सुरु आहे. पीडित सून ही पतीची दुसरी पत्नी असून पहिल्या पत्नीला मूलबाळ न झाल्याने तिच्याशी फारकत घेतल्याची माहिती आहे. दरम्यान, पीडित महिलेची टेस्ट ट्यूब बेबी करून घेतली होती. त्यातून तिला मुलगी झाली. ती साडेचार वर्षांची आहे. मात्र, कुटुंबाला वारस म्हणून मुलगाच हवा या इर्षेने पेटलेल्या सासूने पीडित २९ वर्षीय सुनेला स्वत:च्या २३ वर्षीय अविवाहित भाच्यासोबत बळजबरीने अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. तिने विरोध केला, पण सासूने हाताला चटके दिले, तीन -तीन दिवस उपाशी ठेवले व नराधम तरुणाने शस्त्राच्या धाकावर मुलीला जीवे मारण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केला. २ ऑगस्ट रोजी आष्टी ठाण्यात पीडितेच्या तक्रारीवरुन सासू, सासरा, पती व नराधम तरुणावर गुन्हा नोंद झाला. त्यासाठी पोलिसांनी तीन दिवस चकरा मारायला लावल्या, शिवाय २ ऑगस्ट रोजी दिवसभर ताटकळून ठेवले, असा आरोप पीडितेच्या भावाने ‘लोकमत’शी बोलताना केला.

....

नराधम तरुणासह सासू फरार

पती व सासऱ्याला अंतरिम जामीन मिळाला असून नराधम तरुण व सासू फरार आहेत. विशेष म्हणजे पीडितेच्या साडेचार वर्षांच्या मुलीलाही सासूने साेबत नेले आहे. मुलीच्या काळजीने पीडितेची घालमेल सुरु आहे. दहा दिवस उलटूनही पाेलीस आरोपींना पकडू शकले नाहीत, त्यामुळे पीडितेने रोष व्यक्त केला. आरोपींना १४ ऑगस्टपर्यंत अटक करावी, अन्यथा १५ ऑगस्ट रोजी अज्ञातस्थळी आत्मदहन करण्याचा इशारा तिने दिला आहे.

....

दोन आरोपींना अंतरिम जामीन मिळाला आहे, उर्वरित दोघांचा शोध सुरु आहे. त्यांच्या अटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहे. तपासात दिरंगाई झाली असे म्हणता येणार नाही.

- सलीम चाऊस, पोलीस निरीक्षक, आष्टी ठाणे

...

पीडितेला आरोपींचे काही नातेवाईक गुन्हा मागे घेण्यासाठी धमकावत आहेत. त्यामुळे ती घाबरलेली आहे. याबाबत पोलीस अधीक्षकांकडे ई-मेलद्वारे तक्रार केली आहे. दोन आरोपींचा अंतरिम जामीन रद्द करावा व सर्व आरोपींना अटक करावी, अशी विनंती सत्र न्यायालयाकडे केली आहे.

- शुभम पाटील, पीडितेचे वकील

.....

Web Title: Something for the family lamp but ... ‘that’ mother-in-law had brought six brides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.