पोलीस दलातील बदल्यांमुळे कहीं खुशी, कहीं गम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:38 AM2021-08-24T04:38:25+5:302021-08-24T04:38:25+5:30
बीड : जिल्हा पोलीस दलातील शिपाई ते सहायक उपनिरीक्षक पदावरील २११ अंमलदारांच्या बदल्यांची दुसरी यादी २३ ऑगस्ट रोजी पोलीस ...
बीड : जिल्हा पोलीस दलातील शिपाई ते सहायक उपनिरीक्षक पदावरील २११ अंमलदारांच्या बदल्यांची दुसरी यादी २३ ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी जाहीर केली. दरम्यान, यामध्ये स्वग्राममध्ये (स्वत:च्या तालुक्यात) सेवा बजावणाऱ्यांना बाहेरच्या तालुक्यात नियुक्ती देण्यात आली, तर मूळ नेमणुकीच्या ठिकाणाहून संलग्न म्हणून सोयीच्या ठिकाणी कार्यरत असलेल्यांनाही हटविण्यात आले. त्यामुळे कहीं खुशी, कहीं गम असे वातावरण आहे.
पोलीस दलातील ३०८ अंमलदारांच्या २९ जुलै रोजी प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर स्वग्राम व संलग्न म्हणून सोयीच्या ठिकाणी चिकटून बसलेल्यांची समुपदेशन प्रक्रिया २० ऑगस्ट रोजी राबविण्यात आली होती. यात नव्या नियुक्तीसाठी तीन पर्याय दिले होते. त्यानुसार अंमलदारांनी नोंदविलेला पसंती क्रमांक व रिक्त जागा यांचा ताळमेळ घालून नेमणुका करण्यात आल्या. यानुसार २११ अंमलदारांच्या बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी जारी केले. दरम्यान, काही जणांची गैरसोय झाल्याने नाराजी आहे, तर विशिष्ट ठिकाणी ठाण मांडून बसलेल्यांना हटवून नव्यांना संधी दिल्याने समाधानही व्यक्त होत आहे.
....
काहीजणांची विविध शाखांमध्ये संगीत खुर्ची
एका ठाण्यात किंवा शाखेत अंमलदारांना पाच वर्षे सेवा बजावता येते. मात्र, काही अंमलदार या शाखेतून त्या शाखेत बदली करून घेत संगीत खुर्ची खेळत असल्याचे पाहावयास मिळते. काही अंमलदारांनी राजकीय नेत्यांचे वजन वापरून तसेच वरिष्ठांची मर्जी संपादन करून या शाखेतून त्या शाखेत प्रवास करत १० ते १५ वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ काढल्याचे सूत्रांनी सांगितले. बीड सोडून इतरत्र जाणे टाळण्यासाठी त्यांना शाखा सोडवत नाहीत.
...
एलसीबीवर अनेकांचा डोळा
स्थानिक गुन्हे शाखेतील नऊ अंमलदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या शाखेत नियुक्ती मिळावी यासाठी शेकडो विनंती अर्ज अधीक्षकांकडे आल्याची माहिती सूत्रांनी दिली. काही जणांनी राजकीय नेत्यांकडे फिल्डिंग लावली आहे. या शाखेत नियुक्ती द्यावी तरी कोणाकोणाला, असा प्रश्न वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आहे.
....
दोघांचे बदलीला आव्हान, मॅटमध्ये धाव
२९ जुलै रोजी झालेल्या बदल्यांनंतर दोन अंमलदारांनी न्यायाधिकरणात (मॅट) धाव घेतली. पोलीस कल्याण विभाग व गेवराई ठाण्यातील अंमलदारांचा यात समावेश आहे. कार्यकाल पूर्ण झालेला नसताना व विनंती अर्ज नसतानाही बदली करून अन्याय केल्याचा दावा एका अंमलदाराने केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार न्यायाधीकरणाकडून याबाबत अधीक्षकांना विचारणा देखील झाली. न्यायाधीकरणाने केलेला पत्रव्यवहार विलंबाने वरिष्ठांपर्यंत पोहोचविल्याने एका महिला लिपिकाला पोलीस अधीक्षकांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
....
सर्व बदल्यांची प्रक्रिया शासन निर्देशानुसारच पार पडलेली आहे. बदल्यांमुळे काही जण नाराज असू शकतात. त्यांना न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे. मात्र, संपूर्ण प्रक्रिया नियमाप्रमाणेच राबविली आहे.
- आर. राजा, पोलीस अधीक्षक, बीड
...