..सोमनाथने नववर्ष पाहिलेच नाही !
By admin | Published: January 1, 2016 10:20 PM2016-01-01T22:20:46+5:302016-01-02T08:28:50+5:30
चिमणगावला वादावादीतून हमालाचा खून : नूतन वर्षाला १५ मिनिटे शिल्लक असतानाच झाला घात
कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल हा खासगी साखर कारखाना असून, तेथील बहुसंख्य कामे ही हंगामी कामगारांकडून अथवा कंत्राटी कामगारांकडून केली जातात. अवघ्या २४ दिवसांपूर्वी चिमणगावच्या माळावर कामाच्या शोधात आलेल्या सोमनाथ गोलार याच्या ध्यानी, मनी देखील नसेल की आपले आयुष्य या वर्षाअखेरीस संपणार आहे. किरकोळ वादाची किनार असलेल्या प्रकारातून सोमनाथ याचा क्रूरपणे खून करण्यात आला. अवघे ३५ वय असलेल्या सोमनाथने २०१६ हे नवीन वर्ष पाहिलेच नाही, नवीन वर्ष सुरू होण्यास केवळ काही मिनिटे शिल्लक असताना त्याने नाईलाजास्तव या जगाचा निरोप घेतला. गोलार याचे कुटुंबीय हे ऊसतोडणी कामगार आहेत. तो कामाच्या शोधार्थ जरंडेश्वर शुगर मिलवर आला होता. तेथे त्याने कामाची चौकशी केल्यावर ‘हमाली कंत्राटदाराला भेट, ते तुला काम देतील,’ असे सांगण्यात आले आणि तो कंत्राटदाराला भेटला आणि कामावर हजर झाला. अवघ्या आठच दिवसांत त्यांच्याच भागातील संतोष सातपुते हा देखील हमाल म्हणून गोदामावर हजर झाला.
एकाच भागातील असल्याने दोघांची सुरुवातीला गठ्ठी जमली; मात्र काही दिवसांतच दारूचे व्यसन दोघांच्या मैत्रीच्या आड आले आणि वादावादी सुरू झाली. त्यातून शिवीगाळ आणि एकमेकांना बघून घेण्याची भाषा सुरू झाली. सातपुते हा तसा खुनशी स्वभावाचा असल्याने इतर हमाल त्याला आवर घालत; मात्र तो ऐकण्याची मन:स्थिती ठेवत नव्हता. ३१ डिसेंबरच्या रात्री त्याने मद्यपान केले आणि त्यातून कोयत्याने गळा चिरून आणि मानेवर वार करून गोलार याचा खून केला. खुनानंतर सातपुते याने इतर हमालांच्या खोल्यांची दारे जोरजोरात ठोठावली आणि कोयत्याने त्यांच्या दारावर रक्त देखील शिंपडले. सातपुते हा खुनानंतर देखील बेभान झाला होता. सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेतल्यानंतर तो शांत बसला
. (प्रतिनिधी)
.. वादावादी अन् शुगर मिलकडून मदतीचा हात !
सोमनाथ गोलार याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईक व गोलार याच्या मित्रमंडळींनी नकार दिला. जरंडेश्वर शुगर मिलने आम्हाला आर्थिक मदत द्यावी आणि मृतदेह बीड जिल्ह्यात नेण्यासाठी शववाहिकेची व्यवस्था करावी, या मागणीसाठी त्यांनी वादावादी केली. मिल व्यवस्थापनातील अधिकारी अथवा कर्मचारी हा विषय अंगाला लावून घेण्यास तयार नव्हता, त्यामुळे वातावरण अधिकच चिघळत चालले होते. पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी हवालदार भीमराव यादव यांना नातेवाइकांना सरव्यवस्थापक राक्षे यांच्याशी भेट घालून देण्यास सांगितले. यादव हे नातेवाइकांना घेऊन तडक राक्षे यांच्या दालनात पोहोचले, तेव्हा राक्षे यांना या विषयाची कल्पना नसल्याचे दिसून आले. राक्षे यांनी नातेवाइकांशी चर्चा करत तत्काळ मृतदेह नेण्यासाठी तत्काळ रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. तसेच ‘तुम्ही अर्ज द्या, तुम्हाला आर्थिक मदत देण्याची व्यवस्था करतो,’ असे राक्षे यांनी स्पष्ट करताच सर्वजण दालनातून बाहेर आले आणि वादावादीवर पडदा पडला.