जन्मला मुलगा; मिळाली मुलगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 11:57 PM2018-05-21T23:57:13+5:302018-05-22T13:06:22+5:30
जिल्हा रुग्णालयात मुलगा जन्मला. त्याची नोंदही झाली. प्रकृती खालावल्याने खाजगी रुग्णालयात हलविले. दहा दिवस उपचार झाले. सोमवारी सुटीच्या दिवशी मात्र हातात मुलगी पडली आणि नातेवाईकांना अश्चर्याचा धक्काच बसला.
बीड : जिल्हा रुग्णालयात मुलगा जन्मला. त्याची नोंदही झाली. प्रकृती खालावल्याने खाजगी रुग्णालयात हलविले. दहा दिवस उपचार झाले. सोमवारी सुटीच्या दिवशी मात्र हातात मुलगी पडली आणि नातेवाईकांना अश्चर्याचा धक्काच बसला. जिल्हा व खाजगी रुग्णालयातच आपल्या मुलाचा बदल केल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी बाळ स्वीकारण्यास नकार दिला. या घटनेने खळबळ उडाली असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कागदपत्र पडताळणी सुरु केली आहे.
छाया व राजू थिटे (रा.हिंगोली ह.मु.कुप्पा ता.वडवणी) हे दाम्पत्य कामासाठी मागील सात महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात आले. उपळी येथील गोवर्धन चव्हाण यांच्याकडे त्यांनी साल धरले होते. ११ मे रोजी छाया यांना कळा सुरू झाल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सायंकाळी ४.४५ वा. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला.
परंतु वजन केवळ १ किलो ६०० ग्रॅम असल्याने त्याला अतिदक्षता विभागात ठेवले. येथे त्याच्यावर चार तास उपचार झाले.
परंतु येथील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे व कामचुकारपणामुळे थिटे यांना बाळास खाजगी रूग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर रात्री ९ वाजेच्या सुमारास बाळाला घेऊन ते शहर पोलीस ठाण्यासमोरील थोटे यांच्याकडे दाखल केले. तिथे उपचार झाल्यानंतर त्याला बसस्थानकासमोरील श्री बाल रूग्णालयात दाखल केले.
येथे डॉक्टरांनी बाळाच्या पायाचे ठसे व इतर पुरावे जवळ ठेवत त्याला दाखल करून घेतले.११ ते २१ मे असे दहा दिवस त्याने येथे उपचार केले. २१ मे रोजी सकाळी ८ वाजता त्याला सुट्टी झाली. आईच्या हाती बाळ देताच तो मुलगा नसून मुलगी असल्याचे समजले. यावेळी आईसह इतर नातेवाईकांना धक्काच बसला. त्यानंतर हा सर्व प्रकार इतर नातेवाईकांच्या कानी घातला. आपण मुलाला जन्म दिला असून आपले बाळ बदलल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी श्री बाल रूग्णालयात ठिय्या मांडला. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान यांनी धाव घेत नातेवाईकांची समजूत काढून लवकर तपास लावण्याचे अश्वासन दिले. परंतु नातेवाईकांनी उशिरापर्यंत बाळ स्वीकारले नव्हते. याप्रकरणी पोलीस ठाण्यात रात्रीपर्यंत नोंद करण्यात आलेली नव्हती.
जिल्हा रुग्णालयात मुलाची नोंद
जिल्हा रूग्णालयातील नोंदवही पाहिली असता तिथे मुलगा असल्याची नोंद आहे. तर खाजगी रूग्णालयात स्त्री असल्याची नोंद आहे. त्यामुळे नेमका बदल कोठे झाला, असा सवाल उपस्थित केला जात असून तर्कवितर्क काढले जात आहेत.
डॉक्टरांनी अदलाबदल केली
आम्हाला मुलगा जन्मला होता. डॉक्टरांनीच आमच्या मुलाची अदलाबदल केली आहे. याचा तपास करून आमचे बाळ आम्हाला परत द्यावे. - राजू थिटे, पालक