पित्याचा शब्द पुत्राने निभावला; स्वतःची १६ गुंठे जमीन दान करत वीरशैव स्मशानभूमीचा प्रश्न सोडवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2021 05:33 PM2021-11-15T17:33:06+5:302021-11-15T17:36:20+5:30
वीरशैवतेली समाजाच्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने या समाजाची मोठी कुचंबना,व विविध अडचणी निर्माण झाल्या होत्या.
अंबाजोगाई-:गेल्या अनेक वर्षांपासून वीरशैवतेली स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने विविध अडचणी चा सामना वीरशैवतेली समाजाला करावा लागत असे. या स्मशानभूमी लगत असलेली १६ गुंठे शेतजमीन सारंग पुजारी व कुटुंबियांनी दानपत्र देत हा वर्षानुवर्षे रखडलेला प्रश्न मार्गी लावला.वीरशैवतेली समाजानेही पुजारी कुटुंबियांचा सत्कार करत ऋण व्यक्त केले
येथील वीरशैवतेली समाजाच्या वतीने चौभारा परिसरातील विठ्ठलरुक्मिणी मंदिरात पुजारी कुटुंबीयांच्या ऋणनिर्देश समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास आ.नमिता मुंदडा, सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा,श्रीमती ललीता पुजारी,श्रीमती राजश्री पुजारी,माजी उपनगराध्यक्ष सारंग पुजारी,कृष्णा पुजारी,माजी नगरसेवक दिनेश परदेशी, नगरसेविका संगीता व्यवहारे,बालासाहेब पाथरकर, शेख ताहेर,डॉ.निशिकांत पाचेगांवकर, कल्याण काळे,संतोष लोमटे,शंकरराव व्यवहारे,सुनील व्यवहारे,गिरीश हजारी यांची उपस्थिती होती.
वीरशैवतेली समाजाच्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने या समाजाची मोठी कुचंबना,व विविध अडचणी निर्माण झाल्या होत्या.या स्मशानभूमीलगत पुजारी कुटुंबियांची शेतजमीन आहे.शहरातील जमिनीचे भाव गगनाला भिडलेले असतानाही पुजारी कुटुंबीयांनी सामाजिक दायित्व जोपासत आपल्या मालकीची १६ गुंठे शेतजमीन स्मशानभूमीसाठी दान दिली.आता रस्ता उपलब्ध झाल्याने अनेक प्रश्न व समस्या मार्गी लागल्या आहेत. याचे ऋण व्यक्त करण्यासाठी पुजारी कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ललिता पुजारी व राजश्री पुजारी यांनी दानपत्राचे हस्तांतरण समाजाकडे केले. या वेळी बोलताना सारंग पुजारी म्हणाले की, कोणत्याही समाजाची उपेक्षा होऊ नये.केवळ राजकारण नको तर राजकारणास समाजकारणाची जोड देण्याची शिकवण वडील स्व.नगराध्यक्ष अरुण पुजारी यांच्या कडुन मिळाली.त्यांच्या विचारावरच मार्गक्रमण करून आगामी काळातही सामाजिक कार्य करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.यावेळी दिनेश परदेशी,कृष्णा पुजारी,उमाकांत राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलन बाळासाहेब राऊत यांनी केले.तर उपस्थितांचे आभार नंदकुमार देशमाने यांनी मानले.या कार्यक्रमास वीरशैवतेली समाजातील महिला व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
पित्याने दिलेला शब्द पुत्राने पूर्ण केला
स्व.नगराध्यक्ष अरुण पुजारी यांनी वीरशैवतेली समाजाच्या स्मशानभूमीसाठी जागा देण्यास संमती दिली होती.मात्र तांत्रिक अडचणी व दस्तऐवज यामुळे ही प्रक्रिया रखडली होती.त्यातच अरुण पुजारी यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सारंग पुजारी यांनी स्वतः पुढाकार घेऊन पित्याने दिलेला हा शब्द पुत्राने पूर्ण केला.