खर्चासाठी पैसे न दिल्याने मुलाने केली वडिलांची हत्या; आईनेही दिली मुलाला साथ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 01:46 PM2022-05-04T13:46:30+5:302022-05-04T13:51:04+5:30
वडिलांसोबत पैस्यांवरून नेहमी आई आणि मुलाचा वाद होत असे.
केज (बीड ): खर्चासाठी पैसे न दिल्याने आईच्या मदतीने मुलाने वडिलांना तिफणीने मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या वडिलांचा उपचारादरम्यान सोमवारी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आई व मुलाविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची घटना दहा दिवसांपूर्वी तालुक्यातील बेंगळवाडी येथे घडली होती.
रमेश सोनाजी शिंदे तालुक्यातील बेंगळवाडी येथे पत्नी हिराबाई व मुलगा ऋषिकेशसह राहतात. हिराबाई आणि ऋषिकेश यांचा रमेश यांच्यासोबत पैस्यांवरून कायम वाद होत असे. यातून अनेकदा त्या दोघांनी रमेश यांना मारहाण केली. दरम्यान, दि. २३ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास हिराबाई आणि ऋषिकेश रमेशकडे खर्चासाठी पैसे मागीतले. मात्र, त्यांनी नकार दिला. यामुळे त्यांच्यात पुन्हा पैशावरून जोरदार वाद झाला.
चिडलेल्या ऋषिकेशने घराच्या अंगणात पडलेला तिफणीचा फणा वडिलांच्या डोक्यात मारला. यात रमेश जबर जखमी झाले असतानाही ऋषिकेशने मारहाण सुरूच ठेवली. त्याला हिराबाईने आणखी मारण्यासाठी प्रोत्साहन दिले. रमेशचा आरडाओरडा ऐकून नातेवाईक आणि ग्रामस्थ झाले. त्यांनी जखमी अवस्थेतील रमेश यांना उपचारासाठी नेकनूर आणि नंतर बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, प्रकृती नाजूक झाल्याने रमेशला पुढील उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आले. तिथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना रमेश शिंदे यांचा सोमवारी दुपारी ४ वाजता मृत्यू झाला. या प्रकरणी मयत रमेशचा भाऊ बाबुराव सोनाजी शिंदे यांनी केज पोलीसात दिलेल्या फिर्यादीवरून हिराबाई व ऋषिकेश या आई-मुलावर केज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.या प्रकरणी पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी पाटील करत आहेत.