सासूचा खून करणारा जावई २३ दिवसांनंतर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:35 AM2021-05-19T04:35:23+5:302021-05-19T04:35:23+5:30
केज : भरदिवसा सासूचा खून करून पसार झालेल्या जावयास तब्बल २३ दिवसांनी १८ मे रोजी पोलिसांनी अंबाजोगाई तालुक्यातील ...
केज : भरदिवसा सासूचा खून करून पसार झालेल्या जावयास तब्बल २३ दिवसांनी १८ मे रोजी पोलिसांनी अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथील शेतात सकाळी झोपेत असताना बेड्या ठोकल्या.
मुलीस चांगले सांभाळा, असे जावयास समजावून सांगण्यास अंबाजोगाई तालुक्यातील धायगुडा पिंपळा येथील लोचना माणिक धायगुडे व त्यांचा चुलत पुतण्या अंकुश दिलीप धायगुडे यांच्यावर जावई अमोल वैजिनाथ इंगळे व त्याचा पुतण्या बंटी ऊर्फ प्रशांत बबन इंगळे यांनी २५ एप्रिल रोजी दुपारी धारदार कोयत्याने हल्ला करत वार केले. यात सासू लोचना माणिक धायगुडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर या हल्ल्यात पुतण्या अंकुश दिलीप धायगुडे हा गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर दोघा हल्लेखोरांनी अंकुश धायगुडे यांची दुचाकी घेऊन पळ काढला. याप्रकरणी केज ठाण्यात अंकुश धायगुडे याच्या फिर्यादीवरून अमोल इंंगळे व बंटी ऊर्फ प्रशांत इंगळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. केज पोलिसांनी गुन्हा दाखल होताच बंटी ऊर्फ प्रशांत इंगळे यास तात्काळ ताब्यात घेतले होते. मात्र मुख्य आरोपी अमोल इंगळे हा पोलिसांना गुंगारा देत होता. त्याच्या शोधासाठी पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तैनात केली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत तसेच पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे यांनी १८ मे रोजी पहाटे सापळा लावून सकाळी ७ वाजण्याच्यादरम्यान आरोपीला अटक केली. या पथकात अशोक नामदास, मतीन इनामदार, मंगेश भोले, अमोल गायकवाड, तपास शाखेचे दिलीप गित्ते, महादेव बहिरवाळ, बाळासाहेब थोरात यांचा समावेश होता.
२३ दिवस पोलिसांना गुंगारा
अमोल इंगळे याने सासू लोचना धायगुडे यांचा खून करून रक्ताने माखलेल्या कपड्यात चुलत मेहुण्याच्या दुचाकीवरून गांजीमार्गे सोनीजवळा गाठले. मात्र सोनीजवळ्यातील एका शेतकऱ्याच्या शेतातून जाताना दुचाकीमधील पेट्रोल संपल्याने शेतात दुचाकी लावून तो फरार होऊन पोलिसाना गुंगारा देत होता. त्यास तब्बल २३ दिवसांनी केज पोलिसांनी अटक केली.