मेकॅनिकचा मुलगा बनला जिल्हाधिकारी; अंबाजोगाईच्या किशोरकुमार देवरवाडेचे युपीएससीत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 05:40 PM2021-09-25T17:40:01+5:302021-09-25T17:41:29+5:30

UPSC Result : प्रशासकीय अधिकारी व्हायचे असल्याने त्यांनी रूग्णसेवेबरोबरच अभ्यासही सुरूच ठेवला.

The son of a mechanic became a collector; Kishore Kumar Devarwade of Ambajogai's success with UPS | मेकॅनिकचा मुलगा बनला जिल्हाधिकारी; अंबाजोगाईच्या किशोरकुमार देवरवाडेचे युपीएससीत यश

मेकॅनिकचा मुलगा बनला जिल्हाधिकारी; अंबाजोगाईच्या किशोरकुमार देवरवाडेचे युपीएससीत यश

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोना महामारीत रूग्णसेवाआजही ते लसीकरण विभागात कार्यरत

- अविनाश मुडेगावकर
अंबाजोगाई : वडिलांच्या मेहनतीला मुलाने जिद्दीची जोड देत जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करून दाखवले. राज्य परिवहन महामंडळात मेकॅनिक असलेल्या कर्मचाऱ्याचा मुलगा आता जिल्हाधिकारी होणार आहे. अंबाजोगाई तालुक्यातील देवळा येथील डॉ. किशोरकुमार अशोकराव देवरवाडे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ७३५ वा क्रमांक पटकावून जिल्ह्याची मान उंचावली आहे.

अशोकराव देवरवाडे हे माजलगाव आगारात यांत्रिकी विभागात काम करत होते. तेव्हा किशोरकुमार यांनी माजलगावमधीलच सिद्धेश्वर विद्यालयात प्राथमिक शिक्षण घेतले. नंतर माध्यमिक शिक्षण अंबाजोगाई तर उच्च माध्यमिक शिक्षण लातूरमध्ये घेतले. चांगले गुण घेऊन ते वैद्यकीय क्षेत्रात उतरले. सोलापूरला एमबीबीएस करून स्वाराती महाविद्यालयात रूग्णसेवा केली. परंतु, त्यांना प्रशासकीय अधिकारी व्हायचे असल्याने त्यांनी रूग्णसेवेबरोबरच अभ्यासही सुरूच ठेवला. २०१८-१९ साली त्यांची मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून नियुक्तीही झाली होती. परंतु, तरीही त्यांनी ही नोकरी केली नाही. जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. पुन्हा ते अभ्यासासाठी दिल्लीला गेले. येथेही रूग्णालयात रूग्णसेवा करण्याबरोबरच त्यांनी अभ्यास केला. याच मेहनतीचे त्यांना फळ मिळाले असून, देशात ७३५ वा क्रमांक पटकावून त्यांनी वडिलांची आणि जिल्ह्याची मान उंचावली आहे. त्यांच्या यशाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

परिस्थितीमुळे सायकलवरच प्रवास
डॉ. किशोरकुमार यांची घरची परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे त्यांनी सुरूवातीपासून संघर्ष केलेला आहे. डॉक्टर असतानाही ते परिस्थितीमुळे सायकलवरुनच फिरले. दिल्लीतही रूग्णालयात नोकरी करण्यासाठी त्यांनी रिक्षातून, रेल्वेतून प्रवास केला. याच संघर्षामुळे आज त्यांना हे यश मिळाले आहे.

कोरोना महामारीत रूग्णसेवा
मागील दीड वर्षापासून देशात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. याच महामारीत डॉ. किशोरकुमार यांनी दिल्लीतील रूग्णालयात कोरोना वॉर्डात राहून कर्तव्य बजावत रूग्णसेवा केली. आजही ते लसीकरण विभागात काम करत आहेत.

Web Title: The son of a mechanic became a collector; Kishore Kumar Devarwade of Ambajogai's success with UPS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.