उपद्रवी 'असिमन्टमॅटिक' कार्यकर्त्यांचा लवकरच बंदोबस्त; पंकजा मुंडेंचा इशारा
By सुमेध उघडे | Published: October 24, 2020 07:21 PM2020-10-24T19:21:06+5:302020-10-24T19:24:40+5:30
भविष्यात काम करतांना अशा असिमटोमॅटीक लोकांचा बंदोबस्त करणार
अंबाजोगाई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढविणारे लक्षणे नसलेले असिमन्टमॅटिक रुग्ण जसे समाजासाठी घातक ठरत आहेत. तसेच राजकारणात वरुन एक आणि आतून एक असलेले कार्यकर्ते घातक असतात. अशा उपद्रवींची पारख झाली असून या 'असिमन्टमॅटिक' कार्यकर्त्यांचा लवकरच बंदोबस्त करण्यात येईल असा इशारा माजी मंत्री तथा भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी दिला.
जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. यानंतर पंकजा मुंडे यांच्या पक्षांतराचा मुद्दा सुद्धा पुन्हा चर्चेत आला आहे. पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार का? का आणखी कुठे जाणार? याबाबत विविध अंदाज वर्तविण्यात येत आहेत. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पक्ष आणि राजकारणापासून अलिप्त झाल्यापासून माजी मंत्री मुंडे भाजप सोडणार अशी चर्चा सुरु झाली होती. शनिवारी आ. नमिता मुंदडा यांच्यावतीने भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी मुंडे यांनी या सर्व चर्चेवर भाष्य करत त्यांच्या पक्षांतराच्या अफवा पसरविणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. मुंडे म्हणाल्या, कोरोनात असिमन्टमॅटिक असलेले रुग्ण जसे समाजात साथ फैलावासाठी घातक ठरतात. तसे राजकारणात 'असिमन्टमॅटिक' कार्यकर्तेही घातक आहेत. अशा कार्यकर्त्यांची चांगली पारख आपल्याला झाली आहे. भविष्यात काम करतांना अशा असिमटोमॅटीक लोकांचा बंदोबस्त कसा करायचा, याचा विचार मी केला आहे असा इशाराही मुंडे यांनी यावेळी उपद्रवी कार्यकर्त्यांना दिला.
निर्णय घेण्यास मी खंबीर
माझ्याबद्दल अफवा का पसरविल्या जातात हेच मला समजत नाही. आताही मी शिवसेनेत जाणार का कुठे जाणार? अशा अफवा पसरविल्या जात आहेत. माझ्या भविष्याची चिंता तुम्ही करू नका. मी स्वत: खंबीर आहे. माझ्या पक्षाने मला भरपूर दिलंय. तसेच गोपीनाथराव मुंडे यांची शिदोरी माझ्या पाठीशी भक्कम आहे. त्यामुळे तुम्ही माझी चिंता सोडा. अशा शब्दात अफवा पसरविणाऱ्यांचा त्यांनी खरपूस समाचार घेतला.
लोकांपासून दुरावले नाही
मी या निवडणुकीत पराभूत झाले असले तरी लोकांपासून दुरावले नाही. इंदिरा गांधींपासून अनेकांनी पराभवांचा अनुभव घेतला. यात मी नवीन नाही. जनतेशी जुळलेली नाळ तुटू देणार नाही. आता पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी दिल्याने पुन्हा जोमाने कामाला सुरुवात केली असल्याचे त्यांनी सांगितले. मी मंत्री असतांना जिल्ह्यात विकास कामांसाठी भरघोस निधी आणला. मात्र, यांना कामे करता आले नाहीत. या सरकारमध्ये तो निधी वापस गेला. तुम्ही आमच्याच कामांचे नारळ फोडत आहात. काही तरी नवीन आणा. अशा शब्दात त्यांनी नाव न घेता टीका केली.
ऊसतोड कामगारांना २१ रुपये दरवाढ द्या
ऊसतोड कामगारांना २१ रुपये दरवाढ द्या. ते कामावर जातील. माझे ऊसतोड कामगार शेतकरी विरोधी नाहीत. तर शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आहेत. भविष्यात या कामगारांचे होणारे नुकसान कसं भरून काढायचं हे मी पाहते. मात्र, त्यांना संकटात टाकणार नाही. दसरा होताच कोयते घेऊन ते कामावर निघतील. मात्र, त्यांना २१ रुपये दरवाढ द्या, अशी मागणीही पंकजा मुंडे यांनी यावेळी केली.