पोलीस दिसताच वऱ्हाडी मंडळीने काढला पळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:33 AM2021-03-19T04:33:13+5:302021-03-19T04:33:13+5:30
संतोष स्वामी दिंद्रुड : माजलगाव तालुक्यातील हिवरा येथील एका अल्पवयीन मुलीचे धारुर तालुक्यातील कारी येथील मुलासोबत ...
संतोष स्वामी
दिंद्रुड
: माजलगाव तालुक्यातील हिवरा येथील एका अल्पवयीन मुलीचे धारुर तालुक्यातील कारी येथील मुलासोबत गुरुवारी विवाह लावला जाणार होता. माजलगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या व दिंद्रुड पोलीस विवाहस्थळी दाखल होताच वऱ्हाडी मंडळींनी धूम ठोकल्याने हा बालविवाह रोखण्यात यश आले.
माजलगाव तालुक्यातील हिवरा या गावातील १६ वर्षीय मुलीचा कारी येथे मुलासोबत विवाह आयोजित केला होता. तेथे हळदीचा मांडव व विवाहाचे सर्व सोपस्कार पूर्ण करण्यासाठी दोन्ही कुटुंबातील मंडळी कामाला लागली. बालविवाह होत असल्याची माहिती समजल्यानंतर माजलगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल व दिंद्रुड पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि नीलेश विदाटे हे विवाह स्थळी पोहोचले. यामुळे वऱ्हाडी मंडळीसह सर्वांची धावपळ झाली. मुलगा आणि मुलीकडच्या लोकांनी विवाह समारंभ नसून साखरपुडा कार्यक्रम असल्याचे सांगितले; मात्र उभारलेला मांडव तसेच सदर बाबींमुळे हा बनाव चाैकशीत उघड होताच वऱ्हाडी मंडळीने काढता पाय घेत विवाह सोहळा रद्द केला. सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांच्या सतर्कतेमुळे व दिंद्रुड पोलीसही तत्काळ या ठिकाणी नियोजित विवाहस्थळी पोहोचल्याने हा विवाह रोखण्यात यश आले. दोन्ही कुटुंबीयांना सपोनि नीलेश विदाटे यांनी समज दिली असून, बालविवाहाचे होणारे मुलींवरील वाईट परिणामांबाबत समुपदेशन केले.
मुलींचे शिक्षण थांबते, अकाली मातृत्व लादते
लहान वयात लग्न केल्यामुळे मुलीचे शिक्षण थांबते, तिच्यावर अकाली मातृत्व लादले जाते, हसत्या खेळत्या वयात अशा कोवळ्या पोरींना बाईपण येतं. बालविवाहामुळे मुलींच्या विकासाच्या सर्व संधी हिरावल्या जातात. यामुळे असे बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत. मला हा विवाह संपन्न होण्यासाठी हिवरा येथील कार्यकर्त्यांनी अनेक अामिषे दाखवली; मात्र मी त्यांना बळी न पडता माजलगाव प्रशासनाच्या मदतीने बालविवाह थांबवला, याचे मला मनस्वी समाधान आहे.
-सत्यभामा सौंदरमल, सचिव, निर्धार सामाजिक सेवाभावी संस्था, माजलगाव.
===Photopath===
180321\sanotsh swami_img-20210318-wa0043_14.jpg~180321\sanotsh swami_img-20210318-wa0072_14.jpg
===Caption===
धारूर तालुक्यातील कारी येथे सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा साैंदरमल व पोलिसांनी वेळीच भेट देत बालविवाह रोखला.~