ज्वारीची श्रीमंती वाढली; गव्हापेक्षाही जास्त भाव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:08 AM2021-07-13T04:08:13+5:302021-07-13T04:08:13+5:30

बीड : चार दशकांपूर्वी ज्वारी गरिबांचे धान्य समजले जायचे, तर गहू फक्त सणासुदीला खाल्ला जायचा. त्यावेळी गहू ज्वारीपेक्षा महाग ...

Sorghum wealth increased; Prices higher than wheat! | ज्वारीची श्रीमंती वाढली; गव्हापेक्षाही जास्त भाव !

ज्वारीची श्रीमंती वाढली; गव्हापेक्षाही जास्त भाव !

Next

बीड : चार दशकांपूर्वी ज्वारी गरिबांचे धान्य समजले जायचे, तर गहू फक्त सणासुदीला खाल्ला जायचा. त्यावेळी गहू ज्वारीपेक्षा महाग होता. बदलत्या जीवन शैलीत आज गव्हाची जागा ज्वारीने घेतली आहे. मात्र शेतकऱ्यांचा कापूस, सोयाबीन या नगदी पिकांकडे कल वाढल्याने जिल्ह्यात ज्वारीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. अपचनाचा त्रास नको म्हणून डाएटमध्ये ज्वारी, बाजरीच्या भाकरीचा उपयोग केला जात आहे. हॉटेल, ढाब्यांवरही बाजरी, ज्वारीच्या भाकरीला चांगली मागणी आहे. मात्र घरोघरी गव्हाचा वापर आहारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

बीड, आष्टी, शिरूर, माजलगाव तालुक्यात पूर्वी ज्वारीचे मोठे क्षेत्र होते. मात्र दिवसेंदिवस ते कमी होत गेले. अंबाजोगाई भागात पिवळ्या ज्वारीची उत्पादन घेतले जाते. मात्र निर्यातीसाठी मर्यादा असल्याने व शेती खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नसल्याने ज्वारीचे उत्पादन हळूहळू कमी होत गेले.

अशी वाढली ज्वारीची श्रीमंती (प्रति क्विंटल दर) (ग्राफ)

वर्ष ज्वारी गहू

१९८० १६० १०००

१९९० ५५० १३००

२००० १५०० १८००

२०१० २२०० २१००

२०२० २७०० २३००

२०२१ २७०० २४००

भाकरीच परवडायची म्हणून खायचो

ज्वारीची भाकर सकस असते. खाल्ल्यानंतर काम करण्यासाठी ऊर्जा मिळते. तुराटी किंवा कोळशाच्या चुलीवर भाकर शेकता येते. गव्हाच्या तुलनेत भावही कमी होते. त्यामुळे ज्वारीची भाकरच खायचो.

- सुखदेव लिंबाजी बोंगाने, गंगनाथवाडी, ता.बीड

----------

ज्वारी पचनाला सुलभ आहे. भरपूर जीवनसत्व असल्याने कमी खाऊनही पोट भरल्यासारखे वाटते. चर्बी वाढत नाही. ज्वारीची भाकर खाल्ल्याने अनेक आजार टळतात. आधी ज्वारीचे भाव कमी होते. आज गहू अन् ज्वारीचे भाव जवळपास सारखेच आहेत.

-आश्रुबा विठोबा घुगे, गुंजाळा, ता. बीड

आता चपातीच परवडते

ज्वारीत साखरेचे प्रमाण जास्त असल्याने मधुमेह टाळण्यासाठी रोज गव्हाची पोळी, फुलके खातो. चांगल्या प्रतीचा गहू सहज उपलब्ध होत असल्याने व चपाती भोजनात रुची आणते. ज्वारीच्या तुलनेत गव्हाचे भाव कमी आहेत. गव्हाची चपाती रोज व ज्वारी कधीतरी आहारात बदल म्हणून खातो.

- रमेश बाहेती, माजलगाव

----

मी आधीपासून गहू, ज्वारीची भाकर खात होतो. ट्रेनिंगपासून गव्हाची आवड निर्माण झाली. ज्वारीची भाकर कधीतरी खातो. आता ज्वारी पहिल्यासारखी दर्जेदार मिळत नाही, मिळाली तर भावही जास्त आहेत. गहू परवडतो, म्हणून चपातीच खातो.

- नितीन शिंदे, बीड

----------

आरोग्याची श्रीमंतीही ज्वारीतच

ज्वारीच्या भाकरीला तेल, तूप लागत नाही. पचायला अत्यंत सुलभ आहे. ज्वारीमुळे बद्धकोष्ठता, मूळव्याधीचा त्रास होत नाही. मुतखड्याचा त्रास टाळता येतो. गव्हामुळे बद्धकोष्ठता तसेच ग्लुटोनमुळे त्रास होऊ शकतो. गव्हाच्या तुलनेत ज्वारीत कार्बोहायड्रेटसचे प्रमाण जास्त असल्याने शरीराला ऊर्जा लवकर मिळते.

----------

जिल्ह्यात ज्वारीचे उत्पादन कमालीचे घटले

बीड जिल्ह्यात १९८० पासून गव्हाचे क्षेत्र ५५ हजार हेक्टर कायम आहे. तर ज्वारीचे क्षेत्र ३ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्र होते. ते सध्या १ लाख २५ हजार हेक्टरवर येऊन ठेपले आहे. मागील चाळीस वर्षात ज्वारीचे क्षेत्र ७० टक्क्यांनी घटले आहे. नगदी पिकांकडे शेतकरी वळल्याने ही परिस्थिती आहे.

- रामेश्वर चांडक, कृषितज्ज्ञ, बीड

----------

श्रीमंती आणखी वाढणार

ज्वारीला भविष्यातही चांगली मागणी राहणार आहे. यापुढे सेंद्रिय खताच्या ज्वारीला चांगली किंमत मिळणार आहे. रासायनिक खतांचा वापरामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात मिळत असले तरी सेंद्रिय शेतीतील ज्वारी जीवनसत्वयुक्त व कसदार असते. सेंद्रिय ज्वारीची विश्‍वासार्हता वाढीस लागल्यास ज्वारीला आणखी श्रीमंती येणार आहे.

- विष्णुदास बियाणी, बीड

Web Title: Sorghum wealth increased; Prices higher than wheat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.