अंबाजोगाई तालुक्यात ३६ हजार हेक्टरवरील सोयाबीन बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:36 AM2021-09-26T04:36:38+5:302021-09-26T04:36:38+5:30
अंबाजोगाई : दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यासह अंबाजोगाई तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यात सर्वांत जास्त ...
अंबाजोगाई : दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यासह अंबाजोगाई तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यात सर्वांत जास्त पेरा असलेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने दिलेल्या अहवालानुसार ३६ हजार हेक्टर सोयाबीन बाधित झाले आहे.
मागील दोन दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाल्याने अंबाजोगाईत तालुक्यातील छोटे-मोठे धरणे तुडुंब भरून वाहू लागली आहेत. या मुसळधार पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनच्या शेतीमध्ये पाणीच पाणी झाले आहे. शेतात पाणी साचल्याने हे सोयाबीन पूर्णपणे पाण्यात गेले आहे. त्यातच धनेगाव येथील मांजरा धरण पूर्ण भरल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. यामुळे मांजरा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाहिल्याने आजूबाजूच्या शेतात असलेल्या पिकात पाणी घुसून पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यावर्षी अंबाजोगाई तालुक्यात ५९ हजार हेक्टर सोयाबीनचा पेरा करण्यात आला आहे. पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याची पाहणी कृषी विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. त्यांचे अहवालानुसार अंबाजोगाई तालुक्यात ३६ हजार हेक्टर सोयाबीन बाधित झाले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी राजाराम बर्वे यांनी दिली आहे.
250921\img-20210924-wa0084.jpg
बाधित सोयाबीन