धारूर तालुक्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:23 AM2021-06-11T04:23:26+5:302021-06-11T04:23:26+5:30
धारुर : मागील वर्षी सोयाबीन पिकाचा उतारा आणि भावही चांगला मिळाल्याने यंदा शेतकरी सोयाबीन लागवडीकडे वळत ...
धारुर
: मागील वर्षी सोयाबीन पिकाचा उतारा आणि भावही चांगला मिळाल्याने यंदा शेतकरी सोयाबीन लागवडीकडे वळत आहेत. त्यामुळे कापूस लागवडीचे क्षेत्र घटणार असल्याची माहिती कृषी अधिकारी शरद शिनगारे यांनी दिली
धारुर तालुक्यात खरिपाचे एकूण पेरणी योग्य क्षेत्र ४२ हजार ३२८ हेक्टर एवढे आहे. यंदा कापूस २१ हजार ,सोयाबीन ९ हजार,बाजरीची ६ हजार हेक्टरवर पेरणी होणार आहे. उर्वरित क्षेत्रात मूग,उडीद,ऊस आदी पिके घेतली जाणार आहेत. येत्या चार- पाच दिवसात चांगला पाऊस होताच शेतकरी पेरणीला सुरूवात करणार आहेत. शेतकऱ्यांनी पेरणी करण्यापूर्वी बीजप्रक्रिया करुनच बियाणे लागवड करावीत तसेच १०० मिलीमीटर पाऊस व ६ इंच ओल जमिनीत गेल्यावरच पेरणी करावी. सोयाबीनची लागवड करताना १ ते ५ सेंटिमीटर अंतरावर बी पडले पाहिजे याचीही दक्षता घेणे गरजेचे आहे. अडचण असल्यास शेतकऱ्यांनी तर कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करावा असे तालुका कृषी अधिकारी शरद शिनगारे यांनी कळविले आहे.
सोयाबीनला शेतकऱ्यांची पसंती
मागील वर्षी सोयाबीन पिकाचे बाजारभाव तेजीत राहिले. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा जादा भाव मिळाला. तसेच सोयाबीन पिकाला खर्चही कमी येतो. तसेच दुसरे पीकही घेता येत असल्याने शेतकरी सोयाबीन पिकाला पसंती देत असल्याचे कृषी विक्रेता बाळासाहेब जाधव यांनी सांगितले.
बोंडअळीचा प्रादुर्भाव, अनियमित पाऊस, वेचणीसाठी मजुरीचे वाढलेले दर पाहता मागील काही वर्षात कापूस पीक उत्पादनाच्या दृष्टीने नुकसानीत असल्याने यंदा शेतकरी कापूस पीक घेण्याचे धाडस करू इच्छित नाहीत. त्यामुळे तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत कापूस लागवड क्षेत्रात यंदा ३ हजार हेक्टरने घटीचा अंदाज आहे. तर मागच्या वर्षी सोयाबीन पिकाचा उतारा चांगला व भाव योग्य मिळाल्याने शेतकरी यंदा सोयाबीनला पसंती देत आहेत.
धारूर तालुका खरिपाचे अंदाजित क्षेत्र
कापूस
गतवर्षी - २४,००० हेक्टर
यंदा - २१,००० हेक्टर
(३ हजार हेक्टर क्षेत्र घट)
सोयाबीन
गतवर्षी- ७, ८२६ हेक्टर
यंदा - ९,००० हेक्टर
(११७४ हेक्टर क्षेत्र वाढ)