सोयाबीन पिकाला मोठ्या पावसाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:38 AM2021-08-20T04:38:17+5:302021-08-20T04:38:17+5:30
फेरीवाले मदतीच्या प्रतीक्षेत अंबाजोगाई : फेरीवाल्यांना १० हजार रुपये कर्ज स्वरूपात देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र अद्यापही अनेक ...
फेरीवाले मदतीच्या प्रतीक्षेत
अंबाजोगाई : फेरीवाल्यांना १० हजार रुपये कर्ज स्वरूपात देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र अद्यापही अनेक फेरीवाल्यांना मदत मिळाली नाही. प्रशासन, बँक व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे अनेक फेरीवाल्यांना मदत मिळाली नाही. तसेच कोरोना निर्बंधाच्या काळात रिक्षाचालकांना शासनाने जाहीर केलेली मदतही मिळाली नसल्याने अंबाजोगाई शहरातील फेरीवाले मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
माहिती दिलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार विमा
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात पाटोदा सर्कल परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली राहिली. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतील पिके वाहून गेल्याने या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासकीय यंत्रणांनी केलेल्या पंचनाम्याच्या आधारे शेतकऱ्यांना विमा देण्याबाबत कृषी आयुक्तांनी आदेश दिले होते. दरम्यान, या आदेशाला विमा कंपनीने अखेर केराची टोपली दाखविली आहे. आता नुकसानीची माहिती दिलेल्या शेतकऱ्यांनाच विमा मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती नाही अथवा अनेक शेतकरी मोबाइल निरक्षर आहेत अशा शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई व विमा मिळावा, अशी मागणी भाजपचे कार्यकर्ते शिरीशकुमार मुकडे यांनी केली आहे.
पिकांवर वाढला रोगांचा प्रादुर्भाव
अंबाजोगाई : गेल्या आठ दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे शेतकरी वर्ग चिंतित असून, त्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. सोयाबीन हे नगदी पीक असल्याने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली आहे. यंदा पावसाचे आगमन उशिरा झाल्याने खरीप हंगामातील पिकांची पेरणी उशिराच झाली आहे. अधूनमधून पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली. त्यानंतर रिमझिम पाऊस पडल्याने पिके जोमात होती. सोयाबीन मूग, उडीद, कापूस पिकांची वाढ योग्य प्रमाणात झाली आहे.
बाजारात अस्वच्छता वाढली
अंबाजोगाई : येथील आठवडी बाजार बंद असल्याने सध्या मुख्य रस्त्यावरच बाजार भरू लागला आहे. भाजीपाला विक्रीसाठी आलेले अनेक जण उरलेला भाजीपाला तसाच रस्त्यावर फेकून जातात. अजूबाजूला अनेक व्यापाऱ्यांची दुकाने आहेत. त्यामुळे परिसरात अस्वच्छता वाढत चालली आहे. त्यामुळे विक्रेते व ग्राहक या दोघांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या बाजाराची त्वरित स्वच्छता करण्यात यावी व भाजी विक्रेत्यांना शिस्त लावावी, अशी मागणी होत आहे.