सोयाबीण बियाणे उगवलेच नाही; बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 07:57 PM2020-06-22T19:57:48+5:302020-06-22T19:58:07+5:30
पेरणी खर्चासह कंपनीकडून वसुली करण्याची मागणी
बीड : यावर्षी खरीप हंगामात वेळेवर पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त करत खरीप पेरणीची सुरू केली होती. मात्र, जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोयाबीन बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे.
जिल्ह्याचे खरीप हंगामाचे क्षेत्र ७ लाख ४६ हजार हेक्टर आहे. त्यापैकी कापूस पिकानंतर सर्वाधिक सोयाबीन या पिकाचा पेरा केला जातो. त्यासाठी बाजारात विविध कंपनीचे बियाणे उपलब्ध आहेत. १० जून नंतर मशागतीची कामे उरकल्यावर मोठ्याप्रमाणात सोयबीन पेरणी करण्यात आली. मात्र, अनेक ठिकाणी सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांमधून येत आहे.
एक एकरला १० हजार रुपये खर्च
मागील काही वर्षात दुबार पेरणीचे संकट पाऊस वेळेवर न पडल्यामुळे किंवा पावसाने ओढ दिल्यामुळे आले होते. मात्र, यावर्षी बियाणे न उगवल्यामुळे हे संकट आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती नाजूक असताना आलेले हे संकट मोठे आहे. सोयबीन पेरणी करताना मशागत व लागवडीला एकरी खर्च अंदाजे १० हजार रुपये इतका येतो. प्रत्येक शेतकऱ्याने किमान २ ते १० एकरवर सोयाबीन पेरले आहे. परंतु, सोयाबीन न उगवल्यामुळे केलेला खर्च पाण्यात गेला आहे. त्यामुळे तात्काळ पंचमाने करावेत व झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.
जिल्हाधिकाऱ्याची प्रतिक्रिया नाही
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याशी यासंदर्भात प्रतिक्रिया विचारण्यासाठी संपर्क केला मात्र, त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले.
शेतकऱ्यांनी करावी अशी तक्रार
बियाणे उगवण क्षमता, गुणवत्ता यासंदर्भात झालेल्या नुकसानासाठी प्रत्येक तालुक्यात तालुका तक्रार निवरन समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती कृषी उपविभीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कर्यरत आहे. त्याचे प्रमुख पंचायत समितीचे कृषी अधिकारी असतात त्यांच्याकडे रितसर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी तक्रार करावी. तक्रारीसोबत बियाणे खरेदीची पक्की पावतीची झेरॉक्स जोडावी. त्यामुळे नुकसानभरपाई मिळेल. गावातील ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांनी सरपंच, तालुका तक्रार निवारण समिती, पं.स.कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यापैकी कुणाकडेही तक्रार करावी, असे सांगण्यात आले.
कृषी सहाय्यकांकडील तक्रार ग्राह्य
बियाणांच्या संदर्भात कृषी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे. लेखी स्वरूपात तक्रार प्राप्त झाल्या तर, समिती स्थळ पाहणी करून पंचनामा करतील. शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यकाकडे तक्रार दिली तरी ग्राह्य धरली जाईल.
- राजेंद्र निकम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
पुन्हा पेरणी करावी लागणार
एका सोयाबीन बियाणाच्या बॅगची किंमत २५०० रुपये आहे. मी चार एकरमध्ये ग्रीन गोल्ड कंपनीचा पेरा केला होता. त्यासाठी मशागत व पेरणीसाठी ४० हजार रुपये खर्च आला. ५ ते ७ दिवसांत उगवलेले सोयाबीन दिसलं नाही. त्यामुळे पुन्हा पेरणी करावी लागणार आहे.
- सतिश जगताप, पालसिंगण