सोयाबीन पाण्यामध्ये, शेतकऱ्यांचे नुकसान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2019 12:36 AM2019-10-28T00:36:20+5:302019-10-28T00:36:35+5:30

परिसरातील अनेक भागात सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतातील सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

In soybean water, farmers are at a loss! | सोयाबीन पाण्यामध्ये, शेतकऱ्यांचे नुकसान !

सोयाबीन पाण्यामध्ये, शेतकऱ्यांचे नुकसान !

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : तालुक्यासह परिसरातील अनेक भागात सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतातील सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाने शेतात पूर्णपणे पाणी साचले आहे. त्यामुळे सोयाबीनचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने दाणादाण उडाली. शेतकऱ्यांना शेतीची कामे करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी शेतक-यांनी सोयाबीन काढून त्याची गरज रचली आहे. पण अचानक सुरू होणा-या पावसामुळे शेतक-यांना त्याची रास करण्यास अडचणी येत आहेत. पावसाने यावर्षीही हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसामुळे हिरावला आहे. दुपारपर्यंत आॅक्टोबर हिटचा सामना करणाºया शेतक-यांना दुपारनंतर पावसाचा सामना करावा लागत आहे.
आपेगाव परिसरातील तटबोरगाव, आपेगाव, धानोरा, कोपरा, अंजनपूर व इतर गावांत सोयाबीन काढणीअभावी शेतात भिजत आहे. यामुळे शेतक-यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. त्यातच निवडणुकीच्या धामधुमीत मजूर वर्ग वेळेवर उपलब्ध झाला नाही. यामुळे मिळालेल्या वेळेत खळे करून घेणे शक्य झाले नाही. यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडल्याचे चित्र आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला जेमतेम पडलेल्या पावसाने शेतक-यांनी पेरणी केलेले पीक जोमात होती. चांगली फळधारणा होती. मात्र, खळ्यासाठी सज्ज असलेल्या शेतक-यांवर आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवडयापासून पावसाने सुरुवात केल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावरून घेतला आहे. यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे.
उत्पादनात घट होण्याची शक्यता
परतीच्या पावसाने मुक्काम वाढविल्यामुळे सोयाबीन, उडीद व मूग या पिकांच्या उत्पन्नात यावर्षीही घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिणामी शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला असल्याचे चित्र आहे. लवकर खळे करून यंदाची दिवाळी गोड करावी या आशेने शेतक-याने केलेल्या नियोजनावर पावसाने पाणी फेरले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून पाऊस कधी उघडीप देईल, याकडे लक्ष आहे.
यावर्षी पावसाअभावी खरीप गेलेला आहे. रब्बीची चिंता वाढली असतांना आता चार दिवसापासून पाऊस उघडायचे नाव घेत नाही. या पावसामुळे शेतक-यांचे सोयाबीन पाण्याखाली गेले.
अक्षरश: काढून टाकलेले सोयाबीचे कडप पाण्यावर पोहत आहेत. उभ्या सोयाबीनला कर फुटत आहेत. शेतक-यांची वर्षभराची मेहनत वाया गेली असून प्रचंड प्रमाणात सोयीबनचे नुकसान होत आहे.
हवामान खात्याकडून पावसाचा मुक्काम ३० आॅक्टोबरपर्यत वाढणार असल्याचा अंदाज वर्तविल्यामुळे धाकधुक वाढली आहे. खरीप हंगामातील पिके हातून जाण्याची भीती वाटत आहे.
आठ दिवसांपासून दररोज पाऊस पडत असल्यामुळे परिसर जलमय झाला आहे. पावसामुळे खरीप हंगामातील नुकसान होत असलेल्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे.

Web Title: In soybean water, farmers are at a loss!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.